प्रासंगिक - लोगो
भारतातील सर्वश्रेष्ठ योगसंस्था म्हणून पंतप्रधान यांनी पंचवीस लाख रुपयांचे पारितोषक देऊन पुण्यातील ‘रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्स्टिट्यूट’चा गौरव केला आहे. त्या संस्थेचे संचालक प्रशांत अय्यंगार हे आहेत. या जगात ते ‘आंतरराष्ट्रीय ‘योग शिक्षक-संशोधक’ म्हणून ओळखले जातात. भारत सरकारच्या ‘आयुष मंत्रालयाने’ त्यांचा देशातील नामवंत ‘योगगुरु’ म्हणून त्यांचे छायाचित्र ‘आयुष मंत्रालयाच्या’ संकेत स्थळावर स्थापित केले आहे, यातच त्यांचे मोठेपण दडले आहे.
योगाभ्यास हा चित्त वृत्ती निरोध आहे. योगज्ञान आत्मसात केल्यानंतर व्यक्तीच्या ‘चित्त’ वृत्तीत सकारात्मक बदल होतात म्हणजे अपप्रवृत्तींचा त्याग होतो व चांगल्या प्रवृत्तींकडे आपोआपच मन वळते असे ते सांगतात. बुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं. आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. मन एकाग्र होतं. आपल्या मनाची ताकद वाढविणं, शक्य होत. माणसाचं मन काबूत असणे ही मोठी गोष्ट आहे. तथापि, शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर निश्चितच मात करू शकतो. हे योगासनाद्वारे शक्य आहे अशी त्यांची निष्ठा आहे. मुंबईस रेल्वेने जाताना कर्जत येथे वडा खायची इच्छा असल्यास प्रवास मुंबईपर्यंत असल्याने वडा मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण ही इच्छा कर्जत रेल्वेस्टेशन मुंबईला जायच्या मार्गावरच असल्याने विनासायास मिळणार असते. तद्वत योगआसने करीत असताना योगाचे जे अनेक फायदे स्नातकास आपोआप मिळत असतात. त्यात ‘प्रकृती स्वास्थ्य’ हे एक आहे, त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही असा त्यांचा विश्वास आहे. योगातील ध्यान, धारणा व समाधी अवस्था म्हणजे या विश्वातील ‘योगाविद्येमुळे’ मिळणारा ‘परमोच्च आनंद’ !! पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच यात कार्यरत असतात. हा चैतन्याचा परमोच्च आनंद योगामुळे शक्य आहे असे त्यांचे सांगणे आहे. अधिकाधिक लोकांनी योगविद्येचा अंगीकार केला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटते व म्हणूनच गेली ४९ वर्षे ते योगविद्या शिकविण्याचे पवित्र कार्य मनापासून करीत आहेत.
प्रशांत सरांचा प्राणायामाचा प्रत्येक वर्ग म्हणजे बौद्धिक मेजवानीच ठरावी. ‘श्वासायाम’ हा योगाचा ‘गाभा’ त्यांनी मानला आहे. भौतिक पार्श्वभूमीमुळे ‘मन’ शरीरात बंदिस्त स्थितीत असते तर ‘श्वास’ बाहेरून येतो. ‘श्वास’ कधीच ‘कायमच्या’ वास्तव्यासाठी नसतो. योगात श्वासांमुळे विविध इंद्रियांमध्ये बरेच परिणाम केले जातात. त्यामुळे योगासने झाल्यानंतर शरीरात चैतन्य निर्माण झाल्याने होणारे बदल ‘स्फूती’ निर्माण करतात. सध्या श्वासाचा शरीरावर होणारा परिणाम शास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ झालेला नाही किंबहुना अजून खूप संशोधन होणे बाकी असे त्यांचे मत आहे.
अय्यंगार पॅटर्नमध्ये प्रॉप्सचा शोधून काढलेला वापर योगविद्या शिकविताना ते अतिशय कल्पकतेने करीत असतात त्यामुळे योगासने करताना कधीही थकवा जाणवत नाही पण आसनागणीक शरीरात नवचैतन्य संचारते. प्रशांत सर शतायुषी व्हावेत.
------------