बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रशांत काटे यांना संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्षपदी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील अमोल पाटील यांची निवड केली आहे. आॅक्टोबर महिन्यात अमरसिंह घोलप यांनी राजीनामा दिल्याने प्रदिप निंबाळकर यांची आॅक्टोबर अखेरीस अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. मात्र, निंबाळकर यांनी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. तसेच यापूर्वीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यामुळे मंगळवारी (दि.११) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रियेपूर्वी पक्ष निरीक्षक म्हणून राष्ट्रवादीचे किरण गुजर यांनी अजित पवार यांच्या सुचनेनुसार अध्यक्षपदासाठी काटे आणि उपाध्यक्षपदासाठी पाटील यांच्या नावाचा लखोटा आणला होता. त्यानुसार दोन्ही पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. कारखान्यावर असणारे कोट्यावधीचे कर्ज, यंदाच्या हंगामात जाणवणारी उसाची टंचाई यातून मार्ग काढण्यासाठी अनुभवी व्यक्तीच्या हातात कारखान्याचा कारभार दिला जाणार, अशी शक्यता मागील काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होती. त्याप्रमाणे प्रशांत काटे यांची निवड झाली आहे. काटे यांनी यापूर्वी देखील कारखान्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला आहे. लासुर्णे येथील अमोल पाटील यांना उपाध्यक्षपदी संधी दिल्याने गावात जल्लोष करण्यात आला. ----------------------
छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत काटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 4:17 PM
प्रदिप निंबाळकर यांची श्री छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत वैयक्तिक कारणास्तव बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.
ठळक मुद्देअनुभवी व्यक्तीच्या हातात कारखान्याचा कारभार दिला जाणार, ही शक्यता ठरली खरी