पुणे : पुण्याचा काॅंग्रेसचा उमेदवार काेण असणार ही उत्सुकता अखेर काल रात्री संपली. काल रात्री उशीरा काॅंग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुण्यातून काॅंग्रेसतर्फे काॅंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी आमदार माेहन जाेशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अखेर या उमेदवारी नाट्यावर पडदा पडला. असे असताना नुकताच काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रवीण गायकवाड यांची काहीशी निराशा झाली. आज काॅंग्रेसभवनात आघाडीच्या बैठकीला गायकवाड अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात हाेते.
पुण्याच्या उमेदवारीबाबात माेठा सस्पेन्स काॅंग्रेसने तयार केला हाेता. उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दाेन दिवस उरलेले असताना काॅंग्रेसने काल रात्री उशीरा आपला उमेदवार जाहीर केला. काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकजण इच्छुक हाेते. माजी आमदार माेहन जाेशी यांच्याबराेबरच काॅंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, अभय छाजेड आणि शेतकरी कामगार पक्षातून काॅंग्रेसमध्ये आलेले प्रवीण गायकवाड हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक हाेते. निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी हाेती. गायकवाड यांनी मल्लिकार्जुन खर्गे, अशाेक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे त्यांना उमेदवारीची शक्यता वाढली हाेती.
दरम्यान काॅंग्रेसने उमेदवार जाहीर व्हायच्या आधीच प्रचार सुरु केला हाेता. रविवारी लालमहाल येथे झालेल्या बैठकीत गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना संबाेधित केले हाेते. सर्वच इच्छुक काॅंग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले हाेते. परंतु काल रात्री माेहन जाेशी यांना उमेदवारी जाहीर झाली. आज झालेल्या आघाडीच्या बैठकीत गायकवाड उपस्थित न राहिल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले हाेते.