पुणे : ‘पुुरुषोत्तम’मध्ये सादर होणाऱ्या बहुतांश एकांकिकांवर मालिकांचा प्रभाव जाणवतो. त्यावर आधारित एकांकिकाच परीक्षकांच्या पसंतीस उतरतात, असा एक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहे. म्हणूनच ते यशापासून दूर जात आहेत. समाजातील आसपास घडणाऱ्या किंवा सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या घटनांवर आधारित एकांकिकांचे सादरीकरण केल्यास त्या परीक्षक आणि प्रेक्षकांना अधिक ‘क्लिक’ होतात, अशा शब्दांत ‘पुरुषोत्तमीय’ प्रसिद्ध लेखक प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याकरिता प्रवीण तरडे यांचा मार्गदर्शन ‘क्लास’ नातूवाडा येथील इंदिरा मोरेश्वर सभागृहामध्ये झाला. याप्रसंगी संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई, राजेंद्र नागरे आणि नितीन आपटे यांच्यासह २०० विद्यार्थी उपस्थित होते. तरडे म्हणाले, की वायसीएममध्ये असताना पुरुषोत्तममध्ये कोणत्या एकांकिका सादर करायच्या, याचा आम्ही खूप गांभीर्याने विचार करायचो. या एकांकिकांची निवड करताना समाजात आसपास घडणाऱ्या घटना किंवा सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या घटनांवर अधिक भर देण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. ज्या वेळी कारगिल युद्ध झाले होते, त्याच काळात एकांकिकांच्या निवडीचा कालावधी होता. पहिल्या निवडलेल्या एकांकिकेचा विषय बाजूला ठेवून युद्धाचा विषय निवडला आणि ‘पुरुषार्थ’ एकांकिका सादर केली. कोणतीही एकांकिका सादर करताना ‘अभिनय,’ ‘दिग्दर्शन’ ‘वक्तृत्व’ आणि ‘वाचिक’ या गोष्टींवर भर दिला जाणे आवश्यक आहे. मात्र सध्या स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिकांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना यावरच अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देत आहे. पुरुषोत्तम हे प्रायोगिक सादरीकरणाचे व्यासपीठ आहे. त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये संयोजक कमी पडत नाहीत. स्पर्धेतील कलाकारांची दर्जात्मक संख्या वाढली आहे; मात्र सादरीकरणाचा दर्जाही वाढायला हवा, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
१५ ते १७ डिसेंबर ‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरीयेत्या १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. या फेरीमध्ये पुणे ३, नागपूर ३, कोल्हापूर ४, जळगाव ४ आणि रत्नागिरीचे ४ अशा १८ संघाच्या कलात्मक आविष्काराचे सादरीकरण होणार आहे. १७ डिसेंबरला महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.