पुणे :नवाब मलिक (nawab malik) जणू काही साधू, संत, अहिंसेचे पुजारी असल्यासारखे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारने आंदोलन केले. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते, असं भाजप नेते प्रविण दरेकर (pravin darekar) पुण्यात म्हणाले. सध्या भाजपवर सातत्याने आरोप केला जातो की भाजपा यंत्रणांचा गैरवापर करते. अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावरील कारवाईची मागणी भाजपने केली नाही, असंही दरेकर म्हणाले.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले. शिवसेनेच्या संजय राठोड (sanjay rathod) यांच्यामुळे निष्पाप मुलीला आत्महत्या करावी लागली. ती केस दाबली गेली. हा सत्तेचा गैरवापर आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य केल्यावर त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले. तर दुसरीकडे नाना पटोले (nana patole) यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला, तरी कारवाई नाही. सध्या राज्य सरकार सूड भावनेने राजकारण करत आहे, असंही दरेकर म्हणाले. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
नैतिकतेच्या मुद्द्यावर याआधी महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत, आता ठाकरी बाणा कुठे गेला त्यांना पटत असेल, पण बोलणार कसे? असं प्रविण दरेकर म्हणाले. 'राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तर सत्तेचे काय होणार, त्यामुळे मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. नवाब मलिक देशभक्त असल्याप्रमाणे आव आणला जात आहे.', असंही दरेकर यावेळी म्हणाले.