रोहित पवार अजून लहान आहे, त्यांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी - प्रविण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 05:32 PM2022-06-03T17:32:03+5:302022-06-03T17:42:34+5:30
पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर काय म्हणाले दरेकर?...
पुणे : 'गोपीनाथ मुंडे जर आज हयात असले असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते असे बोलण्याऐवजी रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी', असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला आहे. दरेकरांनी पुण्यात बोलताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, रोहित पवारांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की ते स्वतः मुख्यमंत्री होणार, यावर एकमत करा आणि मग हयात नसलेल्यांशिषयी बोलावे, असा टोलाही लगावलाय.
'रोहित पवारांनी अजित पवारांचं ऐकलं पाहिजे'
पुढे बोलताना दरेकरांनी रोहित पवारांना खोचक टोलाही लगावला. ते म्हणाले, रोहित पवार अजून लहान आहेत. उगीच वाद निर्माण करू नये, असं अजित पवार नेहमी सांगतात ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सध्या राज्यात विरोधक आणि सत्ताधारी वारंवार समोरासमोर येताना दिसत आहे.
पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर काय म्हणाले दरेकर?
'पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. जिथे जिथे त्या गेल्या आहेत, तिथे त्यांनी संधीच सोनं करुन दाखवलं आहे. त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत तिथे त्यांनी चांगलं संघटन केलं आहे, असंही दरेकर म्हणाले. राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले, हा निर्णय वरिष्ठ घेत असतात मोठ्या नेत्यांवर बोलणं उचित नाही.
महागाईवर काय म्हणाले दरेकर?
सध्या केंद्र सरकार उत्तम काम करत आहे. सरकारने महागाईवर पूर्णपणे नियंत्रण आणले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही आटोक्यात आणण्यात केंद्राला यश आले आहे. राज्य सरकारने सेस कमी करून महागाई अजून कमी करण्यात मदत केली पाहिजे, असंही दरेकर यावेळी म्हणाले.