प्रवीण गायकवाड यांचा उद्या काँग्रेस प्रवेश : इच्छुकांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 09:00 PM2019-03-29T21:00:01+5:302019-03-29T21:00:50+5:30
काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले
पुणे : काँग्रेस पक्षाकडूनपुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले प्रवीण गायकवाड यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी शनिवारी मुंबईत पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘महाराष्ट्रातील पाठीराख्यांना वाटते की मला तिकीट मिळावे, त्याचा फायदा महाराष्ट्रात होईल,’ असे वक्तव्य केल्याने अरविंद शिंदे की गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील उमेदवारीबाबत दिल्ली दरबारी चर्चा सुरू आहे. सुरूवातीला गायकवाड यांनी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त करून दिल्लीवारीही केली. पण विरोध झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. मोहन जोशी, शिंदे यांचीच नावे स्पर्धेत असल्याचे चित्र निर्माण झाले. बुधवारी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली. पण दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा गायकवाड यांचे नाव स्पर्धेत आल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये येऊन शहराध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेतली. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना गायकवाड म्हणाले, मी काँग्रेससोबत काम करायचे ठरविले आहे. लोकसभेचे तिकीट हा माझ्यादृष्टीने महत्वाची विषय नव्हता आणि नाही. परंतु, महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजातील माझ्या पाठीराख्यांना वाटते की, आपल्या माणसाला तिकीट मिळालाय हवे. ते मिळाले तर त्याचा फायदा राज्यभरात होईल. नेतेमंडळी काही कारणांमुळे बाहेर असल्याने पक्ष प्रवेशाची प्रक्रिया लांबली होती. आता शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, सोनल पटेल, इतर नेत्यांच्या उपस्थितीत प्राथमिक सदस्यत्व व पक्ष प्रवेश करण्याचे नियोजन आहे.
सोशल इंजिनिअरींगमुळे निवडून येईन :
नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराशी माझा वैचारिक संघर्ष आहे. माझा सत्ताकारणाशी संबंध नाही. पण सत्ताकारण होत असेल आणि मी केलेल्या सोशल इंजिनिअरींगच्या प्रयोगामुळे मी निवडून येऊ शकतो. म्हणून काँग्रेसने मला तिकीट द्यावे. पण जर माझ्यामुळे निष्ठावंतांना अडसर होत असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, अशी स्पष्ट भुमिका गायकवाड यांनी मांडली.
रमेश बागवे, शहराध्यक्ष : प्रवीण गायकवाड शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आले. त्यांनी काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा असून पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ते मुंबईत पक्ष प्रवेश करतील.