पुणे : धार्मिक स्थळ असलेले प्रयागराज लवकरच विमानसेवेद्वारे पुण्याशी जोडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने दोन शहरांदरम्यान विमानसेवेसाठी हिरवा कंदील दाखविला होता. ही सेवा आता ५ मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच हैद्राबाद व बेंगलुरू या दोन शहरांसाठी पुण्यातून नवीन विमानसेवा सुरू होणार आहे.देशात रिजनल कनेक्टिविटी स्कीमअंतर्गत विविध छोटी शहरे विमानसेवेद्वारे जोडली जात आहेत. या योजनेअंतर्गत प्रयागराज या धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या शहराला पुण्याशी जोडण्यात येणार आहे. पुणेविमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो कंपनीचे विमान ५ मार्चपासून दररोज सकाळी ९.२० वाजता प्रयागराज विमानतळावरून उड्डाण करून सकाळी ११.५० वाजता पुण्यात दाखल होईल. तर दुपारी १२.२० वाजता पुण्यातून उड्डाण करून दुपारी २.४५ वाजता प्रयागराजला पोहचेल. या विमानसेवेमुळे प्रयागराजला जाणाºया अनेक भाविकांची सोय होणार आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांकडून या सेवेला प्रतिसाद मिळू शकेल.पुणे विमानतळावरून सध्या दररोज सहा विमानांचे उड्डाण होते. ५ फेब्रवारीपासून त्यामध्ये आणखी एका विमानाची भर पडणार आहे. गो एअर कंपनीकडून ही सेवा सुरू केली जाणार आहे. एअर एशिया कंपनीकडून बेंगलुरूसाठी १५ फेब्रुवारीपासून नवीन विमानसेवा सुरू केली जाईल. दोन्ही सेवा दररोज असणार आहेत. हैद्राबाद विमानतळावरून सकाळी ११.०५ वाजता उड्डाण केलेले विमान पुण्यात १२.२५ वाजता उतरले. हे विमान दुपारी १ वाजता हैद्राबादकडे झेपावून दुपारी २.२० वाजता पोहचेल. तर बेंगलुरू विमानतळावरून पहाटे ४.४५ वाजता उड्डाण केलेले विमान सकाळी ६.१० वाजता पुण्यात दाखल होईल. तर पुण्याहून सकाळी ६.४० वाजता उड्डाण करून ८.१५ वाजता बेंगलुरूमध्ये दाखल होईल.
धार्मिक स्थळ असलेले प्रयागराज लवकरच विमानसेवेद्वारे पुण्याशी जोडले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 7:29 PM
देशात रिजनल कनेक्टिविटी स्कीमअंतर्गत विविध छोटी शहरे विमानसेवेद्वारे जोडली जात आहेत.
ठळक मुद्दे हैद्राबाद व बेंगलुरू : पुण्यातून नवीन विमानसेवा सुरू होणार