पुणे :अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक यादिवशी आपण देवघरांत सोने,चांदी ,हिरे यांचे पूजन करण्यात येते. ते अक्षय रहावे म्हणून प्रार्थना केली जाते. त्यापेक्षाही महत्वाचे आणि अनमोल जर काही आपल्या जीवनात असेल तर ते आहे पाणी. हे पाणी प्रदूषण मुक्त, जिवंत आणि अक्षय रहावे म्हणून भरल्या घटाचे पूजन आणि प्रार्थना या अक्षयतृतीयेच्या निमित्त पर्यावरणप्रेमी करणार आहे.पर्यावरणप्रेमींनी अक्षयतृतीया निमित्त पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. या मुहूर्तावर पाण्याने भरलेले घट दान करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त आपण जल समृद्ध देश घडवण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना करू हे जल दान निश्चित अक्षय राहील. तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या तिथीस महत्त्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. कालविभागाचा कोणताही प्रारंभदिन भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीस स्नान, दान इत्यादी धर्मकृत्ये सांगितली जातात. या दिवशी विष्णूची पूजा, होम, दान करावे असे शास्त्र सांगते.उन्हापासून संरक्षण करणा-या छत्री, पादत्राणे अशा वस्तू दान करण्याची पध्दत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादीही करतात.परंतु, पर्यावरण प्रेमींचा हा उपक्रम इतरांनीही करावा असा आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी गणेश कलापुरे म्हणाले, पाणी हे जीवन असून ते अक्षय राहिले तरच आपण जिवंत राहू. पाण्याचे पूजन करून ते अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार आहे. दरवर्षी मंदिरात जाऊन पाण्याचा घट दान करतो. त्याचे पूजन करतो. मी हा उपक्रम घरी राबवतो. कारण पाणी हे अक्षय रहावे, हा त्यामागील हेतू आहे. प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी देखील हा उपक्रम राबवावा. त्यांचा हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा ठरणारा आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाणी अक्षय राहण्यासाठी प्रार्थना करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 3:59 PM
प्रत्येकजण सोने-चांदीची पूजा करतो. पण त्यापेक्षा पाणी अनमोल आहे. त्याचे पूजन व्हावे आणि ही चळवळ वाढावी हीच इच्छा आहे. पाणी पूजन ही आपली परंपरा आहे, पण सध्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
ठळक मुद्दे हा उपक्रम निश्चितच समाजाला दिशा देणारा