पुणे : मागील काही वर्षांपासून बंद पडलेली प्रीपेड रिक्षा सेवा शुक्रवार (दि. २) पासून सुरू होणार आहे. पुणे रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा थांब्यावर ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सेवेसाठी गुरुवारपर्यंत २५ रिक्षांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, यासाठी ५० रुपयांपर्यंतच्या भाड्यापोटी पाच रुपये, तर त्यापुढील भाड्यापोटी सात रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. काही वर्षांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकासह स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकापासून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू केली होती; पण या सेवेच्या अंमलबजावणीतील विविध त्रुटींमुळे काही महिन्यांतच सेवा बंद पडली. त्यानंतर आता ही सेवा पुन्हा शुक्रवारपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. प्रीपेड रिक्षासाठी गुरुवारपर्यंत २५ रिक्षांची नोंदणी झाली आहे. रिक्षा अॅपवर ही नोंदणी सुरू असून अधिकृत रिक्षा व चालकांचाच यामध्ये समावेश केला जात आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व दोन कर्मचारी असतील असे या योजनेचे समन्वयक राहुल शितोळे यांनी सांगितले. .असे ठरेल भाडेरिक्षामध्ये बसण्याआधीच प्रवाशांना इच्छित ठिकाणचे भाडे मोबाईलवर संदेशाद्वारे समजेल. समजा प्रवासी इच्छित ठिकाणापेक्षा आणखी पुढे गेल्यास रिक्षाचालकाकडील मोबाईल अॅपमध्ये अधिकचे भाडे अंतरानुसार आपोआप येईल. त्यानुसार प्रवाशांना संपूर्ण भाडे द्यावे लागेल. रिक्षाच्या मीटरप्रमाणेच हे भाडे आकारले जाईल. तत्पूर्वी, प्रीपेड बूथवर प्रवाशांना भाड्याच्या रकमेनुसार ५ किंवा ७ रुपयांचे सेवाशुल्क द्यावे लागणार आहे.
पुणे शहरात प्रीपेड रिक्षा आजपासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 1:17 PM
पुणे रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा थांब्यावर ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे..
ठळक मुद्दे प्रीपेड रिक्षासाठी गुरुवारपर्यंत २५ रिक्षांची नोंदणी