पुणे :महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (एमएसआरडीसी) राज्यातील तीन प्रकल्पांची सुमारे ४५ हजार कोटींची पूर्वनिविदा प्रसिद्ध केली आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या पूर्व आणि पश्चिम भागातील १३६.८० किलोमीटर लांबीच्या कामाचा समावेश आहे. त्यामुळे या कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पुणे, पिंपरीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीकडून रिंगरोड बांधण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा एप्रिलमध्ये प्रसिद्ध करण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार महामंडळाने अंतिम निविदा काढण्यापूर्वी पात्रता पूर्व निविदा (प्री क्वालिफिकेशन) प्रसिद्ध केली आहे. पुणे रिंगरोड, जालना ते नांदेड महामार्ग आणि मल्टी मॉडेल कॉरिडॉर या तीन प्रकल्पांचा समावेश आहे. या पूर्व निविदांच्या प्रसिद्धीनंतर या कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
रिंगरोड १६७ किलोमीटर लांबीचा असून, पुरंदर, भोर, मावळ, मुळशी, खेड या तालुक्यांमधून जाणार आहे. तो पूर्व आणि पश्चिम टप्प्यात विभागला गेला. या रिंगरोडच्या बांधकामासाठी सुमारे १५ हजार कोटी, तर भूसंपादनासाठी १२ हजार कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी हुडकोने १० हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी एमएसआरडीसीला हस्तांतरित केला आहे.
दरम्यान, पुणे रिंगरोडमधील पुणे-औरंगाबाद या महामार्गातील सुमारे ३१ किलोमीटर लांबीचा भाग सामाईक आहे. हा भाग ३१ किलोमीटरचा असून, हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) करणार आहे. त्यामुळे एमएसआरडीसीला रिंगरोडचे १३७ किलोमीटर लांबीचेच काम करावे लागणार आहे.
रिंगरोड, मल्टी मॉडेल कॉरिडॉर तसेच जालना-नांदेड महामार्ग अशा तीन प्रकल्पांसाठी सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या कामांची निविदा पूर्व प्रक्रिया राबविली आहे. त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. या प्रकल्पांमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागातील वाहतूक सुधारण्यास महामंडळ प्रयत्नशील आहे.
- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी.