पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अम्रुतमहोत्सवानिमित्त काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे बुधवारी उदघाटन झाले. काँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान मोहिमेतंर्गत हे प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्य द्रुष्टीक्षेपात येइपर्यंत ५ टप्पे करून त्यातील महत्वाच्या घटनांच्या छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेसची निरनिराळी अधिवेशने, त्यातील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,गोपाळ क्रुष्ण गोखले आदींचा सहभाग याची अतीशय दुर्मिळ छायाचित्र आहेत. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक पी. ए. इनामदार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले.
''सर्वधर्मसमभाव हे या देशाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे व ते अबाधित रहायला हवे, ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे असे ते म्हणाले. स्वातंत्र्य लढा आणि काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे, त्याला वेगळे करण्याचा कोणी कितीही प्रयत्न करो, इतिहास कोणालाही पुसता येणार नाही असे प्रदर्शनाचे संयोजक व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अँड.अभय छाजेड म्हणाले. प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांनी नागरिकांनी आवर्जून पहावे,१५ ऑगस्टपर्य़त कार्यालयीन वेळेत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे असे आवाहन छाजेड यांनी केले.'' काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महापालिकेतील गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे आदी उपस्थित होते.