परिंचे : खरिपातील बाजरी व ज्वारी पिकास मध्यम वातावरण राहील तर रब्बी हंगामीतील सर्वच पिकांसाठी उत्तम हवामान व समाधानकारक पाऊस असेल, असे भाकीत श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात अढीद्वारे करण्यात आले. कोरोना काळातील नियमाचे पालन करीत मोजकेच मानकरी, सालकरी, देवस्थान ट्रस्टचे आजी माजी विश्वस्त पदाधिकारी पुजारी ब्राम्हण देऊळवाड्यात उपस्थित होते.
सालाबादप्रमाणे पारंपरिक पध्दतीने मंदिराचे आवारात असणाऱ्या अढीत पाडव्याच्या अगोदर एक दिवसआधी वडाच्या पानांच्या पुडीत पेरणी करण्यात येणारे धान्य ठेवण्यात येते. बारा महिन्यांच्या बारा खड्ड्यांतून व चार दिशांचे चार खड्ड्यांतून हे धान्य ठेवले जाते. ज्या महिन्यात शेतकरी ज्या ज्या धान्याची पेरणी करतो, त्या खड्ड्यात ते धान्य ठेवले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते विधिवत अढींची पूजा करण्यात आली, मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिन्यापासून सुरूवात करून फाल्गुन महिन्यापर्यंतच्या अढीतील वडाच्या पानात बांधलेल्या धान्याच्या पुड्या सोडण्यात आल्या. यामध्ये तीन प्रकारच्या पुड्या दिसून येतात. ज्या धान्याला मोड आलेले असतात ते पीक चांगले समजण्यात येते. जी पुडी ओलसर निघते ते पीक मध्यम तर जी पुडी कोरडी निघते ते पीक येत नाही अशी भाविकांची श्रध्दा आहे. चार दिशांच्या खड्ड्यांतून सर्व एकत्रित धान्य ठेवले जाते. त्यास अंबर म्हणतात. या वर्षी चारही दिशांच्या अंबर चांगल्या निघाल्या, परंतु ज्येष्ठ व आषाढ महिन्यातील बाजरी कोरडी निघाली, कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यातील ज्वारी मध्यम निघाली. या महिन्यातील गहू, हरभरा, भुईमूग पीक चांगले निघाले. या अढीच्या भाकिताबाबत माहिती देताना पुरोहित दीपक थिटे यांनी सांगितले की खरिपातील बाजरी पिकास हवामान मध्यम व रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भूईमूग, जवस, मिरची, खपला, भेंडी पिकाला पाणी व हवामान पोषक असेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नियोजन करावे. या कार्यक्रमात गेली अनेक वर्षांपासून कुमारआप्पा धुमाळ अढी वाचण्यास मदत करतात.
अढीद्वारे पीक पेरणीचे करण्यात येणारे भाकीत ऐकण्यासाठी काही मोजक्याच शेतकऱ्यांची मंदिराच्या परिसरात उपस्थिती होती. भाकिताप्रमाणे शेतकरी पेरणी करतात. मंदिरात होणारी यात्रेच्या वेळची भाकणूक व पाडव्याच्या वेळी अढीद्वारे होणारे पेरणीचे भाकीत खरे ठरते अशी प्रचीती येते.
फोटो ओळ--श्रीक्षेत्र वीर येथे म्हस्कोबा मंदिरात अढीद्वारे पीक पेरणीचे भाकीत करण्यात आले.
A