पुणे : पीएमपीमधील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार देण्यात येणारी तब्बल ९० कोटींची रक्कम दोन्ही महापालिकांनी पीएमपीकडे हस्तांतरित केली आहे. मात्र, त्यातील तब्बल ६०० निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांची फरकाची रक्कम पीएमपीने मार्च २०१६ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी परस्पर वळती केली आहे. दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला दरमहा देण्यात येणारी तब्बल १५ कोटींची संचलन तूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांची फरकाची रक्कम थांबविण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकांकडून ही फरकाची रक्कम मिळविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. पीएमपी कमर्चाऱ्यांंच्या सुधारित वेतन करारानुसार, दोन्ही महापालिकांनी वेतन फरकाचे २७० कोटी रुपये तीन टप्प्यांत देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २०१४ ते २०१५ या वर्षात ९० कोटी रुपये देण्याचा ठराव दोन्ही महापालिकांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महापालिका ५० कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० कोटी रुपये देणार आहे. दोन्ही महापालिकांनी २०१४ मध्ये फरकाचे ९० कोटी रुपये दिले होते. तर, गेल्यावर्षी निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. मात्र, वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही निधी देण्यात आला नव्हता, मागील महिन्यात हा निधी दोन्ही महापालिकांनी पीएमपीकडे वर्ग केला आहे. त्यानंतरही काही दिवस कर्मचारी संघटनांच्या सदस्य फीच्या वादामुळे निधी थांबविण्यात आला होता. त्यानंतर कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेताच हा निधी देण्यात आला. मात्र, त्यातून फरकाची रक्कम देण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)
निवृत्तीधारक वाऱ्यावर
By admin | Published: March 08, 2016 1:28 AM