पुणे : बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आणि चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी प्रित त्रिवेदी (वय ३२, रा. सहकार नगर) हिच्याविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, हा प्रकार ४ ते १७ एप्रिल या दरम्यानच्या काळात घडला आहे. याबाबत नितीन लक्ष्मणराव भोसले (वय ३२, रा. शिवाजी नगर) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादींना त्रिवेदी हिने बिटकॉइनची विक्री करण्यास मदत करते, असे सांगितले.
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक पैसा मिळतो, असे सांगितले. फिर्यादींचा त्रिवेदीवर विश्वास बसल्याने फिर्यादींनी गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने भोसले यांना ७ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. प्रत्यक्ष कोणताही परतावा न मिळाल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याप्रकरणी प्रित त्रिवेदी हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल माने हे करत आहेत.