पुणे : मतदान केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पोलिंग एजंटच्या दुपारच्या भोजनासाठी अजूनही उमेदवारांची पुरीभाजीच्या पॅकेटला मागणी असल्याचे दिसून येत आहे़ काही उमेदवारांनी मसाला पुरी, मटकी, हरभरा भाजी आणि लोणचे यांना पसंती दर्शवली आहे़ प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून एक पोलिंग एजंट सकाळी मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत उपस्थित राहतो़ याशिवाय मतदान केंद्राबाहेर मतदारांना त्यांचे नाव व अनुक्रमांक शोधून देण्यासाठी उमेदवारांचे स्टॉल लागलेले असतात़ त्यावर उमेदवारांचे अनेक कार्यकर्ते कार्यरत असतात़ या सर्वांनी त्यांना नेमून दिलेले काम व्यवस्थित व चोखपणे करावे यासाठी उमेदवारांकडून त्यांच्या चहा, नास्ता व भोजनासाठी जागेवर सोय केली जाते़ त्यासाठी प्रमुख उमेदवारांकडून केटरर्सकडे याअगोदरच मागणी नोंदविण्यात आली आहे़ याबाबत किशोर सरपोतदार यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मतदानासाठी पुरीभाजीच्या पॅकेटची मागणी उमेदवारांकडून नोंदविली जात आहे़ उन्हाळ्याचे दिवस असल्याने व मोठ्या प्रमाणावर पॅकेटची मागणी असल्याने भाजी खराब होऊ नये, यासाठी ती टिकायच्या दृष्टीने आम्ही बटाटे अगोदर तळून घेतो़ पूर्वी द्रोणात भाजी ठेवून त्यावर ५ पुऱ्या, प्लस्टिक पिशवीत लोणचे असे पॅकेट तयार करून ते पुरवीत असायचो़ आता त्यात थोडा बदल झाला आहे़ आता भाजी फॉईल पेपरमध्ये पॅक करून पेपर नॅपकीन, लोणचेचे सॅचे, चमचा एका कंटेनरमधून त्यांचे पॅकेट तयार केले जाते़
पुरीभाजीलाच पसंती
By admin | Published: February 21, 2017 3:22 AM