कोरोना प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्षापासून भोर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गोरगरिबांच्या हाताला काम नसल्याने तसेच उद्योगधंदे बंद असल्याने आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यामध्ये अर्थकरण प्रचंड खालावलेले असून गरजेच्या वस्तू खरेदीसाठी देखील उसनवारी पैसे घेऊन गोरगरीब उपेक्षित कुटुंबांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. अशा आर्थिक परिस्थितीत जीवन जगत असताना केंद्र सरकारकडून वारंवार गॅसच्या भरमसाठ वाढवलेल्या किमतीमुळे गोरगरीब नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याचे गौराबाई रेणुसे यांनी सांगितले
ग्रामीण भागामध्ये बहुतेक गावांमध्ये केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस देण्यात आल्याने धूरमुक्त कुटुंब झाली होती; मात्र गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा महिलांकडून चुलींना पसंती दिल्याने चुली पेटल्या असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने भोर तालुका अनलॉक झाला असला तरीदेखील काही उद्योग, व्यवसाय रुळावर येण्यासाठी वेळ लागणार आहे. पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात झालेली दरवाढ त्याबरोबरच गोरगरिबांची भाकरी भाजणारे गॅस सिलिंडर दर वाढवले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक जेरीस आलेले आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना जळणाला लागडे इंधन गोळा करण्याची सवय डोक्यातून गेली होती; परंतु आता मागचे दिवस या महिला भगिनींसाठीपुढे आलेले दिसत आहेत.
तालुक्यातील ग्रामीण भागात १९५ गावांमध्ये ३० हजारच्या आसपास गॅस ग्राहक असून, महागाईमुळे त्यातील १५ ते १६ हजार ग्राहक गॅसचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. सरकारनं गॅस दिलं अन् महागाई ही वाढवली. ३०० रुपयांचा सिलिंडर ८४० गेला आहे. कुठून आणायचं एवढे पैसे त्यापेक्षा आमची चुलचं लय भारी आहे. असल्याचे ग्रामीण भागातील महिला सांगत आहेत.
भोर तालुक्याच्या ग्रामीण भागात चुलीचा वापर वाढला.