पुणे : गर्भधारणा उपचार, प्रसूती, प्रसूतीपश्चात उपचार व बालकांचे लसीकरण आता महिलांना एकाच छताखाली उपलब्ध हाेणार आहेत. या दवाखान्यांना ‘सुमन’ केंद्र असे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण राज्यात असे 471 सरकारी दवाखाने ओळखण्यात आले असून तेथे ही सुविधा तयार करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये पुणे शहरातील कमला नेहरू हाॅस्पिटलचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने 5 एप्रिल रोजी या निवडलेल्या रुग्णालयांची यादी जारी केली आहे.
या वर्षी हे केंद्र विकसित करण्यात येणार आहेत. या 471 सूमन केंद्रांपैकी 255 सुमन केंद्र हे मूलभूत सेवा, 157 केंद्रांत मूलभूत आपत्कालीन प्रसूती आणि नवजात बालकांची काळजी आणि 59 केंद्रांवर सर्वसमावेशक आपत्कालीन प्रसूती आणि नवजात बालकांची काळजी यावर लक्ष केंद्रित करतील. या 255 सुमन केंद्रांमध्ये प्राथमिक आराेग्य केंद्रांचा समावेश आहे. उरलेल्या 155 केंद्रांमध्ये उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये आणि 59 केंद्रांचा समावेश असेल. या सुमन केंद्रावर गर्भधारणेसाठीचे उपचार, गर्भवती महिलांचे उपचार प्रसूती व प्रसूतीपश्चात उपचार या जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा मोफत पुरवण्यावर भर देतील. प्रसूतीनंतर 6 महिन्यांपर्यंत माता आणि बाळाला सर्वांगीण सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करतील ज्यामुळे निरोगी गर्भधारणा होईल. यामुळे माता मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाणही कमी होईल. केंद्र सरकारने त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतर, निवडलेल्या आरोग्य सुविधांना नॅशनल क्वालिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड्स नुसार प्रमाणपत्र मिळवावे लागेल आणि भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार त्यांच्या सेवा आणि यंत्रसामग्री देखील अपग्रेड करावी लागणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सूरज वाणी म्हणाले, की त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये आधीपासूनच बालरोग विभाग, एनआयसीयु आणि आमच्या स्त्रीरोग विभाग आहे. तसेच या कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांसाठी आणि प्रसूतीनंतरच्या काळजीसाठी आणखी सुविधांमध्ये सुधारणा केल्या जातील. त्यामुळे ससून रुग्णालयावरील भारही कमी होईल.
आरोग्य विभागाचे माता आरोग्य कार्यक्रमाचे सहाय्यक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की या कार्यक्रमाचा उद्देश माता आरोग्य तसेच लहान मुलांचे आरोग्य सुधारणे हा आहे. माता आणि बालमृत्यू कमी करण्यात महाराष्ट्र आधीपासूनच आघाडीवर आहे. त्यामुळे माता व बालमृत्यूंची ही संख्या कमी करण्यास मदत होईल. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आई आणि बालकांना उच्च दर्जाची सेवा देणे, सर्व माता मृत्यूची नोंद करणे, डॉक्टर आणि स्टाफला प्रशिक्षण देणे, आंतर-विभागीय समन्वयासाठी आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी एक सुकाणू समिती स्थापन करणे हे आहे.
महाराष्ट्रातील मातामृत्यू दर 2017-19 मध्ये एक लाख जिवंत बालकांच्या जन्मामागे 38 हाेता. त्यावरू ताे 2018-20 मध्ये एक लाख जिवंत बालकांच्या जन्मामागे ३३ पर्यंत खाली आणला. त्याबददल राज्याचा सत्कार करण्यात आला हाेता.