पुणे : ‘मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी स्त्री भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन,’ अशी शपथ घेऊन संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम पोहोचविण्याठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोर्डावर स्वाक्षरी करून ‘बेटी बचाव’चा नारा दिला. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यामहिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेअंतर्गत राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताहाचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, राणी चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, महिला-बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, प्रकल्प अधिकारी प्रकाश वाघमारे, विस्तार अधिकारी नितीन पवार व सुरेश गुंजाळ तसेच जिल्हा परिषद सदस्या उपस्थित होत्या. स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. याअंतर्गत पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्हाभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ असे या उपक्रमाचे नाव असून, २० ते २६ जानेवारी या काळात मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, विशेष ग्रामसभा, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. ..........जिल्हाधिकाऱ्यांनी फलकावर स्वाक्षरी करून घेतली शपथ!जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फलकावर स्वाक्षरी करून ‘मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही’ अशी शपथ घेतली. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याची सूचना त्यांनी केली. ...........स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात या आठवड्यात राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त राष्ट्रीय कन्या सप्ताह राबवणार आहोत. या कार्यक्रमानुसार स्त्रीजन्माच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातील. - दत्तात्रय मुंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग.
गर्भलिंग तपासणी, भ्रूणहत्या मी होऊ देणार नाही; ‘राष्ट्रीय कन्या सप्ताह’ उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:54 PM
शालेय कार्यक्रम, स्पर्धा, जनजागृती सभा, पथनाट्य, कीर्तन, वृक्षारोपण, गृहभेटी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन..
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सदस्यांनी घेतली शपथ : स्वाक्षरी मोहिमेद्वारे संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीअंगणवाडी सेविकांमार्फत पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार