बारामती : कारने धडक दिल्याने गर्भवती असलेली ऊसतोडणी कामगार महिला गंभीर जखमी झाली. तिच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मोटारचालक पंचायत समिती सदस्याचा मुलगा असल्याने या अपघातानंतरदेखील वडगाव निंबाळकर पोलिसांकडूनही ऊसतोडणी कामगार कुटुंबाला न्याय मिळाला नाही. सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी आलेले दाम्पत्य वसीम हुसेन शेख, त्याची पत्नी आसमा वसीम शेख दोन मुलांसह आज पहाटे कारखानास्थळावरून नीरेकडे ऊसतोडणीसाठी चालले होते. वाघळवाडी येथील प्राथमिक शाळेसमोर मोटार (एमएच ४२/एच ५७२३) या गाडीने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे बैलगाडी रस्त्याच्यालगत उलटली. गाडीत बसलेल्या आसमा शेख या गाडीखाली अडकल्या. अपघाताचा आवाज झाल्याने ग्रामस्थ त्या ठिकाणी पळत आले. दरम्यान, मोटारचालक तेथून पळून गेला. या अपघातात ऊसतोडणी कामगार वसीमदेखील जखमी आहे. आसमा शेख या महिलेला गाडीखालून बाहेर काढले. परंतु, सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या आसमा या महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तातडीच्या उपचारासाठी कारखान्याची रुग्णवाहिकादेखील वेळेत मिळाली नाही, असे नागरिकांनी सांगितले. जखमी अवस्थेत खासगी वाहनांनी तिला लोणंद येथील रुग्णालयात नेले. उपचाराला उशीर झाल्यामुळे तिच्या पोटातील सहा महिन्यांचा गर्भ दगावला. शस्त्रक्रिया करून मृत अर्भक बाहेर काढण्यात आले. या महिलेवर अधिक उपचार करण्यासाठी साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी करंजेपूल दूरक्षेत्र पोलिसांनी त्यांना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आणले. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. (प्रतिनिधी)
गर्भवती ऊसतोडणी महिलेचे अर्भक पोटातच दगावले
By admin | Published: November 11, 2015 1:42 AM