लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गर्भवती महिला त्याचबरोबर स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेणे सध्या टाळावेच. कारण हा नवा आजार असून त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे सुरक्षितता म्हणून लस घेऊ नये, असे आवाहन स्त्रीरोगतज्ज्ञांनी केले आहे. गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत मतमतांतरे आहे. गर्भवती महिलांवर लशीचा काय परिणाम होतो यावर संशोधन सुरू आहे. त्याचे निष्कर्ष समोर आल्यानंतरच ठोस काही सांगता येईल. तूर्तास गर्भवती महिलांनी लस घेण्याची घाई करू नये, असा सल्लाही स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिला आहे..
----------------------------------------------------------------------------------------------
* ज्या महिला बाळांना स्तनपान करीत आहेत, त्यांच्यासह गर्भवती महिलांनी लसीकरण करू नये. हा नवा आजार आहे. त्याच्यावर संशोधन अजून पूर्ण झालेले नाही. मात्र आंतरराष्ट्रीय सोसायटींनी लसीकरणाला हरकत नसल्याचे म्हटले आहे. पण सुरक्षितता म्हणून सध्या लस घेऊ नये.
* लस घेण्याचा खरंतर कोणताही धोका नाही. पण सुरक्षिततेसाठी गरोदरपणाच्या काळात लस घेऊ नये. पण स्तनपान करणाऱ्या महिलांना मी लस घेण्यास सांगत आहे.
* गर्भवती महिलांना इतर लस दिल्या जातात. लसीमधून किमान ७० ते ८० टक्के सुरक्षितता नक्की मिळते.
* गर्भवती महिलांनी या काळात आपली काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळली पाहिजे.
* गर्भवती महिलांनी खासगी रूग्णालयात तपासणीसाठी जाण्यापेक्षा छोटी ओपीडी, क्लिनिकमध्ये जावे. अथवा ऑनलाइन कन्सल्टेशन घ्यावे.
* जी कुटुंबातील व्यक्ती बाहेर सातत्याने जाते, त्या सदस्यांनी गर्भवती महिलांच्या संपर्कात येणे टाळावे.
-डॉ. मंगला वाणी, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ
---------------------------------------------------------------------------------------
* मासिक पाळीचा लसीकरणाशी काही संबंध नाही. लस दिल्याक्षणी प्रतिकारशक्ती तशीही येत नाही. लसीमुळे रोग निर्माण करण्याची क्षमता काढून टाकण्यास मदत होते. एखाद्या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी आर्मी तयार केली जाते. त्यामुळे एखाद्या विषाणूने जर शरीरात जर शिरकाव केला तर त्याच्याविरूद्ध लढा देण्याचे काम ती आर्मी (संरक्षक पेशी) करते.
* मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा प्रश्नच नाही. हार्मोन्स बदलामुळे थकवा, अशक्तपणा येणे या गोष्टी होतात. शरीराच्या आतील भागातील अस्तर गळून पडणे एवढी साधी प्रक्रिया असते.
* गर्भवती महिलांनी लस घेऊ नये. तसेच लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणा होऊ देऊ नका.
* कोरोना आजार हा नवीन आहे. जोवर संशोधन पूर्ण होत नाही तोवर ठोस निष्कर्ष सांगता येणे अवघड आहे. पुरावे समोर यायला काही काळ जावा लागणार आहे.
-डॉ. वैजयंती पटवर्धन, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि चेअरमन वूमन डॉक्टर्स विंग (डब्लूओडब्ल्यू) आयएमए
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नका अशा प्रकारचे मेसेज हे अशास्त्रीय आणि निरर्थक आहेत. महिला कुठल्याही काळात लस घेऊ शकतात. कुणीतरी खोडसाळपणाने हा मेसेज टाकलेला आहे.
* फेडरेशन ऑफ आब्स्टेटिक अँड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (फॉग्सी) या आंतराष्ट्रीय गायनॅक असोसिएशनच्या म्हणण्यानुसार कोरोना प्रतिबंधक लस ही गर्भवती महिलांना देता येऊ शकते. दक्षिण भागातील काही स्त्रीरोगतज्ज्ञ ही लस गर्भवती महिलांना देत आहेत. त्यात कदाचित गर्भवती डॉक्टर्स, परिचारिका किंवा आरोग्यसेवक असू शकतील. अमेरिकेत ३५ हजार गर्भवती महिलांना लस देण्यात आली आहे.
* गर्भवती महिलांना लस द्यावी की नाही यावर स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. फॉग्सी लस द्यावी म्हणते आणि जागतिक आरोग्य संघटना लस देऊ नका म्हणत आहे. त्यामुळे स्त्रीरोतज्ज्ञांमध्येच संभ्रम आहे.
* स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये, परिषदांमध्ये गर्भवती महिलांना लस द्यावी की नाही याबद्दल चर्चा सुरू आहे.
* गर्भवती महिलांनी लस घेण्याची घाई करू नये. यावर सध्या संशोधन सुरू आहे. त्याबाबत ठोस निष्कर्ष समोर आल्यानंतर निर्णय घेता येईल.
डॉ. शिल्पा जोशी-चिटणीस, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ
------------------------