पुणे : पूर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शिवणे भागात घडली. याप्रकरणी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात अल्पवयीन मुलगा बचावला आहे. मात्र, अशाप्रकारे शहरात वैमनस्यातून दहशत माजविण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
याबाबत एका अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुलगा आणि त्याचा मित्र गुरूवारी ( दि. २० ) रात्री साडेनऊच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसासाठी निघाले होते. वारजे भागातील रामनगर परिसरात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मित्राला टोळक्याने अडवले. दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. टोळक्यातील एकाने त्याच्याकडील पिस्तुलातून अल्पवयीन मुलावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील रहिवासी जमा झाले. टोळक्यातील काहीजणांनी रहिवाशांना दमबाजी करीत विटा फेकून मारल्या आहेत. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे तपास करत आहेत.