पुणे विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका; 87 हजार 416 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 09:19 PM2020-10-16T21:19:30+5:302020-10-16T21:36:10+5:30
तब्बल 40 हजार लोकांना विभागात करावे लागले स्थलांतरीत
पुणे : पुणे विभागात बुधवार (दि.14) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 87 हजार 416 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक 58 हजार पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यातील तर पुणे जिल्ह्यात 18 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 8 व्यक्ती मयत झाल्या असून, तब्बल 1 हजार 21 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. या अतिवृष्टीमुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून, तब्बल 3 हजार 156 घरांची पडझड झाली असून, 100 झोपड्या देखील पडल्या आहेत.
राज्यासह पुणे विभागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा फार मोठा फटका पुणे विभागातील सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला बसला आहे. बुधवारी (दि 14) रोजी विभागात मुसळधार पाऊस झाला. यात तब्बल 16 तालुक्यात एका दिवसात शंभर मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला. तर पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने 40 हजार 36 लोकांना स्थलांतरीत करावे लागले. या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 4, सांगली जिल्ह्यात 3 आणि पुणे जिल्ह्यात एक व्यक्ती मयत झाली. जीवत हानी सोबतच जनावरांना देखील पावसाचा फटका बसला आहे. यात सोलापूर जिल्ह्यात 829 व पुणे जिल्ह्यात 153 जनावरे वाहून गेली आहेत.
----
अतिवृष्टीमुळे पुणे विभागात झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती
जिल्हा हेक्टर क्षेत्र घरांची पडझड मयत जनावरे
पुणे 18,746 265 153
सातारा 1,420 267 11
सांगली 8,276 365 28
सोलापूर 58,581 2,256 829
कोल्हापूर 393 03 0
एकूण 87146 3156 1029