पुणे : मराठी रंगभूमीवरील मानाचे पान असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ नाटकाचे रुपरी पडद्यावर भव्य दर्शन असलेली सांगीतिक भेट रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार आहे़ एस्सेल व्हिजन प्रस्तृत आणि लोकमत सीएनएक्स आयोजित या चित्रपटाचा भव्य प्रिमीयर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ई-स्क्वेअर येथे होणार आहे़ सुबोध भावे, राहुल देशपांडे, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, महेश काळे आदी कलावंत तसेच विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्रिमीयर होईल. तब्बल साडेतीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर साकारलेल्या या चित्रपटात मराठी-हिंदीतील अनेक दिग्गज कलावंत एकत्र आले आहेत़ या चित्रपटाद्वारे सुबोध भावे यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पर्दापण केले आहे़ तसेच, ज्येष्ठ अभिनेता सचिन यांनी प्रथमच ग्रे शेड असलेली भूमिका रंगवली आहे़ आपल्या अंभग, भावगीते आणि मराठी हिंदी चित्रपटगीतांनी रसिकांना भारावून टाकणारे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन हे प्रथमच पडद्यावर दिसणार आहेत़ त्यांची गायकीही येथे पाहायला मिळेल़ पुरुषोत्तम दारव्हेकरांचे लेखन, पं. जितेंद्रबुवा अभिषेकी यांचे संगीत आणि पं. वसंतराव देशपांडे यांनी साकारलेले खाँसाहेब या वैशिष्ट्यांमुळे कट्यार काळजात घुसली हे नाटक संगीत रंगभूमीवर अजरामर ठरले आहे़ या नाटकावर चित्रपट येत असल्याने रसिकांची उत्कंठा वाढलेली आहे़ त्यात त्यातील अनेक गीतांना मोठा प्रतिसाद मिळाल्याने प्रेक्षकांची वाढलेली उत्सुकता गुरुवारी पाडव्याचा गोडवा वाढविणारा ठरणार आहे़ या चित्रपटामुळे शास्त्रीय संगीताची मेजवानीच चित्रपट रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. हा प्रिमीयर शो फक्त निमंत्रितांसाठी आहे. (प्रतिनिधी)
‘कट्यार काळजात घुसली’चा आज प्रिमीयर
By admin | Published: November 12, 2015 2:34 AM