पुणे : गर्भधारणा झाल्यानंतर महिलांना बाळ कसे वाढत आहे हे पाहण्यासाठी काही कालावधीनंतर रक्त तपासणी आणि सोनोग्राफी करावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत चाचण्यांची सोय असते. मात्र, ज्या महिला कोणत्याही चाचणीच्या अहवालाशिवाय जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होतात, अशा वेळी रक्ताचा नमुना घेऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसूती करण्यावर भर दिला जातो. अतिगंभीर केस असल्यास ससून रुग्णालयात रवानगी केली जाते.
कोरोनामुळे गेल्या वर्षात कुठलीही चाचणी न करता थेट प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आवश्यक त्यास चाचण्या झाल्या नसल्यास व्यंग बाळ जन्माला येण्याचे प्रमाणही वाढते. जिल्हा रुग्णालयात अशा परिस्थितीत महिला प्रसूतीसाठी आल्यास केस पेपरवर ‘नोंदणीशिवाय’ किंवा ‘चाचण्यांशिवाय’ अशी नोंद केली जात आहे.
-----
१) गेल्या वर्षभरात शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रसूती (एप्रिल २०२०-मार्च २०२१)
नॉर्मल प्रसूती - ६८०
सिझेरियन - २८०
--------
चाचण्या आवश्यकच
गर्भवतींना काळात ब्लड काऊंट, ब्लड ग्रुप, आरएच टायपिंग, युरिन टेस्ट, थायरॉईड, ब्लड शुगर, एचआयव्ही, व्हीडीआरएल, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, सोनोग्राफी या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सर्व गर्भवती महिलांच्या या चाचण्या केल्या जातात. कोरोनाच्या काळात प्रसूतीच्या ७-१० दिवस आधी आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. इमर्जन्सी प्रसूती करायची वेळ आल्यास रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाते.
-----
प्रसूतीपूर्वी आरटीपीसीआर किंवा अँटिजन चाचण्या करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. नोंदणी न झालेली किंवा चाचण्या न झालेल्या गर्भवती जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यास आवश्यक चाचण्या तातडीने केल्या जातात. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्वी एचबी, ब्लड काऊंट अशा मूलभूत चाचण्या व्हायच्या. आता हिंद लॅब आरोग्य केंद्राशी संलग्न केली असल्याने रक्त तपासण्या होतात. एखादी गर्भवती तातडीच्या परिस्थितीत आल्यावर रक्त तपासणी करून प्रसूती केली जाते. अहवाल आल्यावर त्यानुसार उपचार ठरवले जातात.
- डॉ. नीलम दीक्षित, प्रसूतीविभागतज्ज्ञ, औंध जिल्हा रुग्णालय