पुणे : राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांनी राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत, यासंदर्भातील आराखडा मंगळवारी (दि. १) प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांना इयत्ता नववी व दहावीतील विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच, दहावीचा निकाल इयत्ता नववीमधील गुण आणि शाळास्तरावर इयत्ता दहावीत घेतलेल्या विविध परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले. त्यानुसार राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने विविध परीक्षांमध्ये प्राप्त केलेले गुण शाळांकडून राज्य मंडळ मागविणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण शाळांनी कोणत्या स्वरूपात भरून पाठवावेत याबाबतचा आराखडा राज्य मंडळाकडून तयार केला जात आहे.
राज्यातील काही शिक्षकांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार कच्चा आराखडा तयार केला होता. सचिन वाकचौरे या शिक्षकाने तयार केलेला आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केवळ निकाल तयार करण्याची प्राथमिक तयारी म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावर अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या. राज्य मंडळाच्या निकालात काही विषयांना श्रेणी (ग्रेड) दिली जाते. या विषयांचे गुण कसे घ्यावेत? याबाबत शिक्षक व मुख्याध्यापकांनी मध्ये संभ्रम आहे.
-----------------
इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळांनी कोणत्या स्वरूपात राज्य मंडळाला गुण पाठवावेत याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या मंगळवारी यासंदर्भातील आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडे शाळांनी गुण पाठविणे आवश्यक आहे.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
--------------------
राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार तयार केलेल्या कच्च्या आराखड्यावर शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. गुणपत्रिकेत श्रेणी दिल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षणसारख्या विषयांचे गुण कसे द्यावेत, याबाबत अनेक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या मनात शंका आहेत. मंडळाकडून या शंकांचे निरसन होईल, अशी अपेक्षा आहे.
- सचिन वाकचौरे, शिक्षक
------------
दहावी परीक्षेस नोंदणी केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या
एकूण विद्यार्थी : १६ लाख २०६
मुले : ८ लाख ६६ हजार ५७२
मुली : ७ लाख ३३ हजार ५३२
ट्रान्सजेंडर : १०२
------------
----------