पुणे : अभिनय या क्षेत्रात सुरुवातीचा मार्ग दाखवणारा आणि तरुण पिढीला एक नवीन वाटचाल मिळवून देणारा अभिनय या क्षेत्राचे उल्लेखनीय कला मंच म्हणजेच पुरुषोत्तम करंडक होय. या पुरुषोत्तम महाकरंडकासाठी पुण्यासह इतर विभागातील महाविद्यालयांची तयारी पूर्ण झाली आहे. पुरुषोत्तम महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १५, १६, १७ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. या महाअंतिम फेरीचे परीक्षण नाट्यअभिनेते विद्याधर जोशी, दिग्दर्शक अश्विनी गिरी, अभिनेते बाळकृष्ण दामले करणार आहेत. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची आॅगस्टमध्ये पुणे विभागातून सुरुवात झाली. त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नागपूर या विभागांत ही स्पर्धा घेतली. प्रत्येक विभागातून सांघिक पारितोषिके काढली. त्यामध्ये पुणे विभागातून तीन सांघिक पारितोषिके, रत्नागिरी विभागातून चार, जळगाव विभागातून चार व नागपूर विभागातून तीन असे एकूण अठरा महाविद्यालयांची निवड महाकरंडकासाठी करण्यात आली.
आमची तालीम नियमितपणे सुरू आहे. सध्या बेसिक गोष्टींचा सराव करत आहोत. गेली दोन वर्षे पुण्यात महाकरंडक मिळत नाही. त्यासाठी यंदाच्या वर्षी हा मान मिळवण्याचा प्रयत्न करू. - ऋषी मनोहर, विद्यार्थी दिग्दर्शक, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे
परीक्षा असल्याने तालीम थोडी थांबवली होती. पण गेल्या दोन दिवसांत तालमीला जोरदार सुरुवात करून नाटकात काही बदल केलेला नाही. आम्ही गेली दोन दिवस तालमीला सहा तास अतिशय प्रामाणिकपणे सराव केल्याने करंडक जिंकण्यासाठी एक विश्वास निर्माण झाला आहे.-सिद्धांत पाटील, विद्यार्थी दिग्दर्शक, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे
पुण्यात पुरुषोत्तम करंडक जिंकल्यावर आत्मविश्वासात भर पडली आहे. त्या अनुषंगाने महाकरंडकावरसुद्धा नाव कोरण्याचे ध्येय ठेवले आहे. एकांकिकेत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत.-कृष्णा वाळके, विद्यार्थी दिग्दर्शक, न्यू आर्ट्स, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, अहमदनगर-पुणे
पुरुषोत्तम महाकरंडक जिंकणे म्हणजे या स्पर्धेत एक वेगळेच स्थान निर्माण करण्यासारखे आहे. आमची जोमाने तयारी पूर्ण झाली आहे. पुन्हा तोच जोश घेऊन आम्ही रंगमंचावर उतरणार आहोत.- भूमिका पाटील, विद्यार्थी दिग्दर्शक, प्रताप महाविद्यालय, जळगाव
आमची ही पहिली वेळ आहे. पुरुषोत्तम महाकरंडकसाठी आमची निवड झाली याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या टीममध्ये एकूण दहा कलाकार असून रंगमंचावर दोनच कलाकार नाटक सादर करतात व बाकी सर्व नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यामध्ये आहेत. आमचे दोन कलाकार उत्तम अभिनय दाखवून करंडक मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. - ओंकार देव, विद्यार्थी दिग्दर्शक, संताजी महाविद्यालय, नागपूर