लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती तालुक्याला आता खरिप हंगामाचे वेध लागले आहेत. मागील वर्षी खरिप हंगामात बारामती तालुक्यात सुमारे ९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सलग पाच वर्षे दुष्काळाचे तोंड पाहिलेल्या जिरायती भागासाठी खरिप हंगाम महत्त्वाचा मानला जातो. तालुका कृषी विभाग व पंचायत समितीने खरिप हंगामाचे नियोजन केले आहे. बारामती तालुका मुख्यत्वे रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र जिरायती भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात पावसाच्या भरवशावर खरिपाची पिके घेत असतात. मागील वर्षी खरिप हंगामात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. खरिपामध्ये तालुक्यात मुख्यत्वे बाजरी, मका, सोयाबिन, तूर, सुर्यफुल आदी विविध प्रकारच्या पिकांची लागवडी होतात. बाजरीची तालुक्यात सर्वात जास्त सरासरी ९ हजार ५४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याखालोखाल मका, इतर तृणधान्ये, कडधान्य आणि तेलबियांच्या लागवडी होत असतात. जिरायती भागाला पावसाने सुरुवातीच्या काळात चांगला हात दिला तर येथील हंगाम यशस्वी होतो. मात्र मागील पाच वर्षांपासून जिरायती भागावर पावसाची अवकृपा राहिली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मागील पाचही खरिप हंगाम वाया गेले आहेत. मान्सून देशात दाखल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी देखील पावसासाठी आतुर झाला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात पूर्ण होत आहेत. शेतजमिनी नांगरून पेरणीसाठी तयार झाल्या आहेत. यावेळी तरी खरिपात चांगला पाऊस पडावा यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागानेही तयारी पूर्ण केली आहे. खते, बी-बियाणांचा पुरेसा साठा केला आहे, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ५१८ टन बियाणांची मागणी खरिप हंगासाठी १७ हजार ७९० टन खते तर १ हजार २४ क्विंटल बियाणांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. खतामध्ये युरीया ७ हजार ७८० टन एवढा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. त्याखालोखाल एसएसपी, एमओपी यांच्यासह इतर रासायनिक खते उपलब्ध करण्यात आली आहेत. तर संयुक्त खतांचा ६ हजार ९७० टन खते उपलब्ध करण्यात आली आहेत. यंदा खत विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनचा वापर करण्यात येणार आहे. तालुक्यासाठी संकरित बाजरी, सुधारित बाजरी, मका, भूईमुग, सूर्यफूल, सोयाबिन, तूर, मूग, उडीद, ढेंचा, ताग आदी बियाणांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. तर यंदा महाबीजकडून तालुक्यासाठी ५१८ मेट्रिक टन बियाणांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. बियाणांचे नमुने ठेवा...हंगामामध्ये अनेक बोगस कंपन्या निकृष्ट प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत असतात. त्यामुळे मेहनत घेऊनही हंगामात पिके हातची गेल्याची उदाहरणे अनेक वेळा दिसून आली आहेत. त्यामुळे खरेदी केलेल्या बियाणांच्या पावत्या, बिले शेतकऱ्यांनी जपून ठेवावीत. तसेच आपण पेरत असलेल्या बियाणांमधील नमुने शिल्लक ठेवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बारामती तालुक्यात खरिपाची तयारी पूर्ण
By admin | Published: May 31, 2017 1:53 AM