पुणे: केंद्र सरकारच्या निर्देषानुसार पुणे महापालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी शहरात ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. याकरिता ५ स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून, या वयोगटातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नावनोंदणी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्यासाठी महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. केंद्राच्या सूचनेनुसार या लाभार्थी वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. महापालिकेने याकरिता कोव्हॅक्सिन लसीचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवला आहे. शहरातील सर्व भागातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्राच्या कोविन पोर्टल अथवा एप्लिकेशनचा वापर नावनोंदणी करण्यासाठी करता येणार आहे. या वयोगटासाठी ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली असून, लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक राहणार आहे. लसीकरणासाठी ही केंद्र उपलब्ध
१) कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर२) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ३) कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड४) भारतरत्न स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा५) कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द
शहरात दोन लाख लाभार्थी
महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी पात्र मुलांची संख्या २ लाख २ हजार १०८ इतकी आहे. केंद्राच्या निर्देषानुसार शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४.८ टक्के संख्या या लसीकरणासाठी पात्र धरण्यात आली आहे. तर शहरात शिक्षणासाठी असलेले अथवा ये-जा करणाऱ्यांची ५० ते १ लाखापर्यंतची संख्या अधिकची गृहित धरण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे ५० हजारहून अधिक डोस शिल्लक असून, केंद्र शासनाकडूनही १ जानेवारीपासून या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक कोव्हॅक्सिन लसीचा अधिकचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे या वयोगटातील सर्वांना लस मिळेल अशी व्यवस्था महापालिकेने केली आहे.