पुणे : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघांकरिता सोमवारी (दि. १३) मतदान होत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. या निवडणुका पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या. दिवसे म्हणाले, ‘जिल्ह्यात २८ एप्रिलपासून ६८ लाख ७३ हजार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात पुणे मतदारसंघात ८१ टक्के, शिरूरमध्ये ७३ टक्के तर मावळमध्ये ८३ टक्के चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. पुणे शहरात ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या ५१० इमारती आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात २ तर कोथरूड मतदारसंघात २ सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यात वडगावशेरीत एकूण ५ हजार ६४१ आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघात ८ हजार ८ मतदार आहेत.’
पुणे लोकसभा मतदारसंघात १२ ड अर्थात घरबसल्या मतदानासाठी अर्ज भरलेल्या ४६३ पैकी ४४० ज्येष्ठ नागरिक, ४२ पैकी ४१ दिव्यांग नागरिक तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात ३८१ पैकी ३५१ ज्येष्ठ नागरिक, ८७ पैकी ८४ दिव्यांग नागरिक आणि मावळ लोकसभा मतदारसंघात २६३ पैकी २४५ ज्येष्ठ नागरिक व ४५ पैकी ४० दिव्यांग नागरिकांनी घरूनच टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात १० व मावळ लोकसभा मतदारसंघात ३ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पुणे, शिरूर व मावळ मतदारसंघात १६ संवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची तयारी झाली आहे. त्यात पुणे मतदारसंघात १०, शिरूरमध्ये १ तर मावळमध्ये ५ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने १०० पेक्षा जास्त जाहिरातींचे प्रमाणीकरण केले आहे. समाजमाध्यमांवर प्रमाणीकरण न करता सुरू असलेल्या ३५ पेक्षा अधिक उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्रावर केवळ याच व्यक्तींना प्रवेश
मतदान केंद्रासाठी ठरवून दिलेल्या मतदारांव्यतिरिक्त मतदान अधिकारी, प्रत्येक उमेदवार, त्याचा निवडणूक प्रतिनिधी व प्रत्येक उमेदवाराचा यथोचितरीत्या नियुक्त केलेला एकावेळी एकच मतदान प्रतिनिधी, भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या प्रसारमाध्यमातील व्यक्ती, महत्त्वाचे, संवेदनाक्षम मतदान केंद्र असल्यास त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षक, व्हिडीओ ग्राफर, छायाचित्रकार, वेब कास्टिंग करणारा कर्मचारी वर्ग, मतदाराबरोबर असलेले लहान बाळ, अंध किंवा आधाराशिवाय चालू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांबरोबर असलेली व्यक्ती, मतदारांची ओळख पटण्यासाठी किंवा मतदान करून घेण्याच्या कामी मतदान केंद्राध्यक्ष यांना अन्यप्रकारे साहाय्य करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष वेळोवेळी ज्यांना प्रवेश देतील अशा व्यक्तींनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
दिव्यांग व वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा
दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. या तीन मतदारसंघांत १ हजार ७७० इमारतींमध्ये मतदान केंद्रांची सोय करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार २ हजार ३०० व्हीलचेअरची सोय उपलब्ध असेल. ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर येणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी वाहनांची तसेच सहायकांची विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.