पुणे : तब्बल दोन वर्षांच्या विरामानंतर ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव’ रंगणार असल्याने, महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा ‘स्वरभास्कर’ पं.भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी होत असल्याने, एक वेगळीच झळाळी महोत्सवाला प्राप्त होणार आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे ७ ते ८ हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या मांडवाची उभारणी करण्यात आली असून, जुन्या जमान्यातील नामवंत प्रकाश चित्रकार वा.ना. भट यांनी पं. भीमसेनजींच्या तरुणपणी काढलेले तब्बल १८ फूट उंचीचे व्यक्तिचित्र महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
देश-विदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा ‘स्वरयज्ञ’ आजपासून (दि. १४) मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. या महोत्सवात दिग्गजांसह नवोदित कलाकारांच्याकलाविष्काराचा नजराणा रसिकांसमोर पेश होणार आहे. महोत्सवात येणाऱ्या रसिकांसाठी विविध सोईसुविधा देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा, यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्सही लावण्यात आल्या आहेत. रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, तसेच पीएमपीएमएलतर्फे कार्यक्रम संपल्यानंतर, विशेष बससेवा रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, पुण्यातील रिक्षा संघटनांनीही रसिकांना अपेक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
महोत्सवाचा पहिला दिवस (दि. १४)
पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महोत्सवाची सुरुवात किराणा घराण्याचे गायक पं.उपेंद्र भट यांच्या गायनाने होईल. त्यानंतर, ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल व संगीतमार्तंड पं.जसराज यांचे भाचे व शिष्य पं.रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. महोत्सवाचा समारोप सरोदवादक अमजद अली खाँ यांच्या बहारदार सरोदवादनाने होईल.
यंदा महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भीमसेनजींच्या विविध भावमुद्रा निवडून संगणकाच्या साहाय्याने त्यावर चित्र-संस्कार करीत ज्या मुद्रा तयार झाल्या, त्या चित्रांचा वापर करूनच या वर्षीच्या ‘स्वर भीमसेन २०२३’ या दिनदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती करण्यात आली आहे. प्रकाश चित्रकार सतीश पाकणीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक दिनदर्शिकेचे महोत्सवात पहिल्या दिवशी विश्वविख्यात सरोद वादक उस्ताद अमजद अली खाँ यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.