पुणे : पेरणे येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यंदा तब्बल २० लाखांहून अधिक अनुयायी येण्याची शक्यता संघटनांनी व्यक्त केली आहे. तसेच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, संयुक्त अरब अमिरातीसह तब्बल १६ देशांतून अनुयायी अभिवादनासाठी येणार आहेत. या अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे, अशी माहिती कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली.१ जानेवारी रोजी पेरणे येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून आंबेडकरी अनुयायी येत असतात. या सर्व अनुयायांना पिण्याचे पाणी, पार्किंगची व्यवस्था, शौचालय, बसण्याची जागा इत्यादी पायाभूत सुविधा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीच्या वतीने पुरविण्यात येत आहेत. यंदा अनुयायांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट देण्याच्या घटनेला दोन वर्षांनंतर शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे २०२७ मध्ये मोठ्या प्रमाणात अनुयायी गर्दी करतील, ही शक्यता लक्षात घेऊन या वर्षापासूनच नियोजन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत २० पेक्षा अधिक बैठका पार पडल्या आहेत. दरम्यान, १ जानेवारी रोजी होणारी गर्दी लक्षात घेऊन मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील ३१ डिसेंबरपासूनच प्रत्यक्ष अभिवादनाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
विजयस्तंभ शौर्यदिनाची संघटनांकडून तयारी पूर्ण ; देश-विदेशातून अनुयायी येणार
By नितीन चौधरी | Updated: December 26, 2024 19:52 IST