पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी हवाई दलाने जागेच्या मोबदल्यात विमानतळ परिसरातीलच जागा मागितली आहे. ही जागा खासगी असल्याने संपादनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, सोमवारी महापालिका आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत योग्य मोबदल्यानंतर संबंधित जागा देण्यास जागामालकांनी होकार दर्शविला असल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.लोहगाव विमानतळावरून विमानांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विमानतळ परिसरातील पायाभूत सुविधा आणखी बळकट करण्याची गरज आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय असून, लोहगाव विमानतळ हवाई दलाच्या ताब्यात आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) हवाई दलाकडे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा मागितली आहे. मात्र, या जागेच्या बदल्यात तितकीच पर्यायी जागेची मागणी हवाई दलाकडून करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य सरकारने २५ एकर जागा हस्तांतरित करावी, असा आदेश केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी विमानतळ पायाभूत समितीच्या दिल्लीतील बैठकीमध्ये दिले होते. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी (दि. १२) सकाळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमवेत बैठक घेतली. लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक २३७, २४८ आणि २५३ या मिळकतींवर वाहनतळ, कार्यालय आणि साठवणुकीचे आगार यांचे आरक्षण दाखविण्याची प्रक्रिया नगरविकास विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता नगरविकास विभागाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना कायदा (एमआरटीपी अॅक्ट) १९६६ अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
लोहगाव विमानतळाला जागा देण्याची तयारी, महापालिका आयुक्तांसमवेत झाली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:58 AM