काटेवाडी - अवघ्या सात दिवसांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील काटेवाडी येथे मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा होणार आहे. या सोहळ्याची काटेवाडीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे.पालखी सोहळा पोहोचल्यावर अनोख्या पद्धतीने धोतराच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात येते. पालखी सोहळा रस्त्यानजीक असलेल्या धर्मशाळेत विसावा घेत असे कांलातराने धर्मशाळा मोडकळीस आल्याने ग्रामस्थांनी पालखी सोहळा विसाव्यासाठी गावामध्ये नेण्याचे नियोजन केले. पालखीरथ रस्त्यावर थांबवून रथामधून तुकाराममहाराजांची पालखी ग्रामस्थ खांद्यावरून गावामध्ये दर्शनासाठी घेऊन जातात. धोतराच्या पायघड्या अंथरून पालखी सोहळ्याचे स्वागत करतात. हा अनोखा स्वागत सोहळा पाहण्यासाठी वैष्णव या ठिकाणी हजेरी लावतात. दुपारी परिसरातील मेंढ्यांंचा वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पार पडतो. हा क्षण पाहण्यासाठी आबालवृद्धांसह वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. हा रिंगण सोहळा शनिवारी (दि. १४) आहे.यावेळी पालखी सोहळ्यातील पहिले रथाभोवती मेंढ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण पार पडणार आहे.बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळा दुपारचे भोजन व विश्रांतीसाठी येथे विसावतो. येथील दर्शनमंडपाचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग, वीज वितरण विभागासह ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर व सोहळा पुढील मुक्कामी गेल्यावर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच विद्याधर काटे यांनी दिली.- राज्यात स्वच्छताग्राम म्हणून काटेवाडी गावची ओळख आहे. पालखी सोहळ्यात राज्यातून येणारा लाखो वैष्णवांचा मेळा या गावाची आवर्जून माहिती घेतो.- या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन नियोजन करीत आहेत. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरू आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी दुतर्फा केलेली वृक्षलागवड लक्षवेधी ठरली आहे.- सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, परिसर स्वच्छता, परिसरातील विहिरीतील शुद्धीकरण, पालखी सोहळ्यात आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे.
मेंढ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळ्याची तयारी, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 12:58 AM