सासवड : संत ज्ञानेश्वरमहाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेवमहाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ होत आहे. यानिमित्त शनिवारपासून शुक्रवारपर्यंत (दि. २९ ते ४ जानेवारी) या कालावधीत हा सोहळा सुरू राहणार असून यानिमित्त राज्याच्या विविध भागांतून दिंड्यांचे आगमन होणार आहे. सासवड (ता. पुरंदर) येथे कºहा नदीच्या काठावर संत सोपानदेव मंदिरात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २९) सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर दुपारी हभप विजय भिसे यांचे प्रवचन व रात्री एकनाथमहाराज पवार यांचे रात्री कीर्तन होणार असून त्यानंतर सासवड येथील हनुमान भजनी मंडळाचे जागर होणार आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी परशुराम काळे व सायंकाळी सोपानराव वाईकर यांचे प्रवचन होईल. सोमवारी (दि. ३१) सकाळी ९ ते ११ या वेळेत राजाराममहाराज कामठे यांचे कीर्तन होईल. दुपारी १२ ते ३ जेजुरी येथील काशिनाथमहाराज यांचे भजन होईल. सायंकाळी ५ ते ६ निळोबाराय शिरसाट यांचे प्रवचन होईल. रात्री ८ ते १० या वेळात बंडामहाराज कराडकर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर अंकुश दीक्षित यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी (दि. १ जानेवारी) पहाटे संत सोपानदेव समाधीस पवमान, अभिषेक घालून सकाळी ६ ते ८ सोपान वाईकर व त्यानंतर ९ ते ११ गेनबा पवार यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ झेंडेमहाराज यांचे प्रवचन होणार आहे. बुधवारी (दि. २) सकाळी ९ ते ११ दिवे पंचक्रोशीतील कातोबानाथ दिंडी यांच्यावतीने कीर्तन होईल. दुपारी १२ ते २ सुनील फडतरे (बोपगाव) यांचे कीर्तन होईल. ३ ते ६ या वेळेत चक्री प्रवचन होईल. रात्री ८ ते १० बाळासाहेबमहाराज देहूकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.मार्गशीर्ष वद्य १३, गुरुवारी (दि. ३) संत सोपानदेव समाधी सोहळ्याचा प्रमुख दिवस असून यादिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत संत नामदेवमहाराज यांचे १६ वे वंशज हभप केशवमहाराज नामदास (पंढरपूर) यांचे संत सोपानदेव समाधीचे कीर्तन होईल. तसेच दहीहंडी व दिंडी प्रदक्षिणा करण्यात येईल. दुपारी २ वाजता पुरंदर तालुक्यातील नवी मुंबईस्थित रहिवासी असलेल्या अंजीर मंडळाकडून भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ ते ४ या वेळेत श्रीमती सत्यवती एदलाबादकर यांचे प्रवचन होईल. त्यानंतर दुपारी ४ ते ५ या वेळेत सासवड येथील महिला भजनी मंडळाच्यावतीने भजन संगीत होणार आहे. शुक्रवारी (दि. ४) या सोहळ्याचा अंतिम दिवस असून या दिवशी सकाळी ११.३० ते १२ या वेळेत संत सोपानदेव समाधीस गरम पाण्याने प्रक्षाळपूजा घालण्यात येणार आहे. दुपारी ४ ते ५ काळेवाडी येथील भाऊसाहेब काळे यांचे प्रवचन होईल. रात्री ८ ते १० या वेळेत संत नामदेवमहाराजांचे १७ वे वंशज ज्ञानेश्वरमहाराज नामदास यांचे कीर्तन होईल. त्यानंतर संत सोपानदेव समाधी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात येईल.