पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सध्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. परीक्षा विभागाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेच्या तयारीलासुद्धा सुरुवात केली आहे. येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या सत्राची परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा ऑनलाइन परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कामांना सुरुवात करावी लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतले जात आहे. सध्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू असून येत्या १० ते १५ मेपर्यंत चालणार आहेत. परीक्षा १० एप्रिलपासून सुरू झालेल्या असून, बरोबर महिनाभरात संपणार आहेत. परंतु, या परीक्षा संपण्यापूर्वीच विद्यापीठाने द्वितीय सत्राच्या परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, परीक्षेचे वेळापत्रक तयार करणे, प्राध्यापकांकडून प्रश्नसंच मागविणे, नव्याने तयार केलेल्या क्रेडिट कोर्सचे क्रेडिट निश्चित करणे आदी कामे विद्यापीठाने सुरू केली आहेत. पहिल्या सत्राच्या परीक्षा येत्या १५ मेपर्यंत संपतील. दीड ते दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविली जाईल.
विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीने यंदा ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्यामुळे द्वितीय सत्राच्या परीक्षासुद्धा विद्यापीठाच्या कंपनीकडून घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यापीठाचे लाखो रुपये वाचणार आहेत.