जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवती यात्रेचा उत्सव येत्या सोमवारी (दि. २१) साजरा होणार आहे. खंडोबा गडकोटावरून देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा दुपारी १ वाजता प्रस्थान करणार आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्यादरम्यान कऱ्हा नदीतीरी विधिवत स्नानाचा सोहळा होणार असल्याची माहिती देवाचे मानकरी वतनदार इनामदार पेशवे यांनी दिली.जेजुरीतील सोमवती यात्रा उत्सवानिमित्त समस्त जेजुरीकर ग्रामस्थ खांदेकरी मानकरी मंडळाची बैठक ऐतिहासिक मल्हार गौतमेश्वर मंदिर (छत्री मंदिर) येथे आयोजिण्यात आली होती. या वेळी मानकरी वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे, सुधीर गोडसे, दशरथ घोरपडे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, राजेंद्र खाडे, दिलावर मणेर, नंदू निरगुडे, रोहिदास माळवदकर, अरुण खोमणे, सतीश कदम, छबन कुदळे, कृष्णा कुदळे, अमोल शिंदे, संतोष खोमणे, देविदास कुंभार, रामभाऊ माळवदकर, पंडित हरपळे, रामभाऊ पवार, चंद्रकांत दरेकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या सोमवारी (दि. २७) अमावस्या सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी अमावस्याकाळ सुरू होत असून दाते पंचांगानुसार देवकार्य आणि धार्मिक विधींसाठी तसेच उत्सवमूर्तीना स्नानासाठी हा दिवस चांगला असल्याचे वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारी दुपारी १२ च्यादरम्यान वर्दी देण्यात येऊन १ वाजता गडकोटावरून उत्सवमूर्तींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे, तर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कऱ्हा नदीतीरी पापनाशतीर्थावर विधिवत स्नानाचा कार्यक्रम होणार आहे. (वार्ताहर)
जेजुरीत सोमवती यात्रेची तयारी पूर्ण
By admin | Published: March 22, 2017 3:05 AM