पुणे : जिल्ह्यातील पश्चिम घाटातील ३२७ इको सेन्सेटिव्ह गावांचा प्रारूप आराखडा तयार झाला असून, येत्या १५ मेपर्यंत हा आराखडा शासनाला पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यातील ३२७ गावांचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश केला आहे. पर्यावरण (संवर्धन) कायदा १९८६च्या कलम ५च्या तरतुदीनुसार या गावांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही उद्योग-व्यवसायांवर बंधने घालण्यात आली आहेत. तसेच, या भागात बांधकामांवरदेखील मर्यादा घालण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संरक्षण होण्यासाठी याबाबत गावकऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. त्यानुसार वरील सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेऊन इको सेन्सेटिव्ह म्हणजे काय, त्यामुळे काय फायदा होणार आहे, कोणकोणत्या गोष्टीवर मर्यादा येतील, याची माहिती देण्यात आली. त्यानंतर इको सेन्सेटिव्ह गावांमध्ये समावेश होण्यासाठी सर्व गावांचे ठराव व ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले. त्यानंतर प्रत्येक गावाचा गावनिहाय प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी) निर्णयाआधी घेतली गावकऱ्यांची संमती४जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले, की गेल्या दोन महिन्यांपासून गावांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे काम सुरू आहे. सुरवातील मुळशीमधील १६ व मावळमधील ८ गावांनी इको सेन्सेटिव्ह भागातून वगळण्याची मागणी केली होती. त्यांनतर गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या शंका दूर केल्यानंतर त्यांनी संमती दिली. इको सेन्सेटिव्ह गावांचा अहवाल तयार झाला असून, तो लवकरच शासनाला पाठविण्यात येईल.
३३७ गावांचा इको सेन्सेटिव्ह प्रारूप आराखडा तयार
By admin | Published: May 07, 2015 5:36 AM