नसरापूरसह पंचक्रोशीत परिसरात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात कांदा, टोमॅटो, वांगी, ज्वारी, भुईमूग, रब्बी पिकाचे व आंब्याचे नुकसान होणार आहे. आज (दि. २७) दुपारी टपोऱ्या थेंबांसह पावसाने हजेरी लावली. नागरिकांची एकच धावपळ झाली. विजा कमी अधिक प्रमाणात उशिरापर्यंत चमकत होत्या. या पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त पिकांचे पंचनाम्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
सद्यस्थितीला काही ठिकाणी शेतामध्ये कांदा काढणीची कामे चालू आहेत. अगोदरच कांद्याचा दर कमी झाल्याने शेतकरीवर्ग नाराज होता. त्यातच अचानक पाऊस पडल्याने शेतातील काढलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याचबरोबर यादरम्यान वीज खंडित झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे.
भोर तालुक्यात दौंड व इंदापूर तालुक्यातून अनेक मेंढपाळ चाऱ्याच्या शोधात भोर तालुक्यात ऑक्टोबर ते जून महिना या हंगामात येत असतात. त्यामुळे मेंढपाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुटुंबासह राहतात. अचानक पाऊस झाल्याने शेतामध्ये माती भिजल्याने मेंढपाळांच्या मेंढ्यांना याचा त्रास होतो.
लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक घरात थांबल्याने घरात बसूनच पावसाचा आनंद घेत होते.