पुणे: यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने १०६ टक्के सरासरी पाऊस सांगितला होता. त्यापेक्षा अधिक पाऊस झाला. तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास कमाल तापमान नोंदवले गेले. आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून, येत्या ६ ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, असा अंदाज देण्यात आला.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ‘ला निना’ वादळाचा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ्याचा अंदाज वर्तविला आहे. ऑक्टोबर महिन्यातच ‘ला निना’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. जर ‘ला निना’चा प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमानात लक्षणीयरित्या घट होऊ शकते. परिणामी थंडीत वाढ होईल.
देशाच्या काही भागामध्ये थंडी चांगलीच कडाडणार आहे. त्यामध्ये पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतातील काही भाग असेल, येथे किमान व कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. यंदा मध्य भारतामध्ये उन्ह, पाऊस खूप होते, त्यामुळे थंडी देखील चांगलीच जाणवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सून १० ऑक्टोबरनंतर संपूर्णपणे परतेल आणि साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरवात होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागानूसार ऑक्टोबर महिन्यांत ‘ला निना’चा प्रभाव सुरू होऊ शकतो. जर ‘ला निना’ प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला, तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान खूप कमी होऊ शकते. परिणामी थंडीत वाढ होईल. ‘ला निना’मुळे तापमानात घट होते आणि तापमानात गारवा वाढतो.
तीन दिवस पाऊस !
नवरात्र उत्सवाच्या अगोदर बुधवारी (दि.२) पुण्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असणार आहे. तर ६ ऑक्टोबर पासून पुन्हा तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.