पुणे : पुणे शहरात शुक्रवारी दुपारपासूनच ढग दाटून आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तास शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम होता. गेल्या काही दिवसांपासून शहरात उकाड्याने त्रस्त असताना सायंकाळी कोसळलेल्या पावसाने पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला.
पुण्यात शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.डेक्कन,कोथरुड, कर्वेनगर कात्रज, बिबबेवाडी, सिंहगड रस्ता, धायरी, घोरपडी, वानवडी,धायरी, आंबेगाव, धनकवडी, वारजे माळवाडी या परिसरात पावसाचा जोर चांगला होता. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची मात्र पावसाने चांगलीच तारांबळ उडाल्याचे देखील चित्र पाहायला मिळाले.
दक्षिण मध्य महाराष्ट व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. त्यामुळे सध्या मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळी पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला होता.
राज्यात ३ मे पर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा, तसेच हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.