- राजानंद मोरेपुणे - विद्यार्थ्यांनी चरख्यावर सूतकताई करून तयार झालेल्या कापडापासून राष्ट्रपती आणि पंतप्रधान याच्यासाठी जॅकेट तयार होणार आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही सूतकताई केली आहे. या सुतापासून वर्धा येथून पाच मीटर कापड तयार करून घेण्यात आले आहे. हे कापड उद्या दिल्लीला रवाना केले जाईल.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र तसेच राज्य शासन, विविध पक्ष संघटनांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. पण या विद्यार्थ्यानी चरख्यावर सूतकताई करून ख-या अर्थाने गांधीजींपासून प्रेरणा घेतल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शालेमध्ये मागील दीड वर्षांपासून कार्यशिक्षण या विषयांतर्गत चरख्यावर सूतकताई करणे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता, चिकाटी आणि स्वावलंबनाचे महत्त्वा कळावे हा यामागचा हेतू. या उपक्रमासाठी शाळेने वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून तीन अंबर चरखे आणले. त्यावर आधी माधव सहस्त्रबुद्धे यांनी शिक्षकांना सूतकताईचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर शिक्षकानी विद्यार्थ्यांना शिकविले. शाळेतील इयत्ता नववी आणि दहावीच्या ३० विद्यार्थ्यांना या उपक्रमात घेण्यात आले. शिक्षक स्वाती जज्जल व भगवान जानकर हे या विभागाचे प्रमुख आहेत.सूतकताईसाठी लागणा-या कापसाच्या वातीही वर्धा येथून आणण्यात आल्या आहेत. सुरुवातीला दर आठवड्याला दोन तास आणि वर्षभरापासून दररोज एक तास असे सूतकताईचे काम सुरू होते. दोन मीटर कापड तयार होण्यासाठी सलग आठ ते दहा तास सूतकताई करावी लागते. विद्यार्थ्यांनी मागील दीड वर्ष शाळेचे वेळापत्रक सांभाळून केलेल्या सूतकताईतून तब्बल पाच मीटर कापड तयार झाले आहे. सेवाग्राम आश्रमातील वीणकरांनी हे कापड तयार केले आहे. त्यांच्याकडे महिनाभरापूर्वी सूत पाठविण्यात आले होते. पाच मीटर कापडापैकी अडीच मीटर कापड राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि अडीच मीटर कापड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. या कापडापासून त्यांनी जॅकेट तयार करावे, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या काही दिवस आधीच हे कापड तयार झाले. तर जयंतीच्या पूर्वसंध्येला कापड विद्यार्थ्याकडे एका विशेष कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आले. -------------------शाळेत सूत कताईचा उपक्रम सुरूच ठेवला जाणार आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या सूतकताईमधून त्यांच्यासाठी शर्ट तयार करण्याचे नियोजन होते. मात्र त्यासाठी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आता किमान हातरुमाल करण्याचा विचार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. ----------------अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामधील कापडाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, त्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. सूतकताई करताना अत्यंत लक्षपूर्वक करावे लागते. त्यातून एकाग्रता आणि चिकाटी वाढते. याचा विद्यार्थ्याना खुप फायदा झाला आहे.- नागेश मोने, मुख्याध्यापकन्यू इंग्लिश स्कूल
विद्यार्थ्यांनी कातलेल्या सुताच्या कापडातून बनणार राष्ट्रपती व पंतप्रधानांचे जॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:07 PM