पुणे: स्वतंत्र वैचारिक मांडणीतून नवनवीन विषयांवर लेखन करणारे भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्री. मा. भावे (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे देहदान करण्यात आले. गणितीतज्ज्ञ, तर्कशास्त्र आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक होता. गणित आणि अर्थशास्त्रामध्ये बीए आणि गणितशास्त्रात एमए ची पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर गणित आणि तत्वज्ञान विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळविली.वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि गणितशास्त्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. ते काही काळ आयआयटी पवई येथे कार्यरत होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटचे ते सदस्य होते. वाई येथील प्रज्ञापाठशाळेचे ते पदाधिकारी होते. गणित आणि तत्वज्ञान विषयाशी संबंधित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनेक परिषदांमधून २५ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळात आधी सचिव आणि नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. तीस वर्षे योगदान देऊन त्यांनी संस्था नावारूपास आणली. भावे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने शताब्दी साजरी केली. ' सरखेल कोलंबस', ' थॉमस पेन',' ' जेनी ग्रंडे', आणि 'जीर्णोद्धार' अशी त्यांनी चार पुस्तके लिहिली. 'जीर्णोद्धार' हे त्यांचे पुस्तक अभ्यासकांसाठी महत्त्वाचे मानले जाते. या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाचा ' ना.ह आपटे पुरस्कार तसेच मुंबईच्या शब्द फाउंडेशनचा दुर्गाबाई भागवत पुरस्कार मिळाला आहे. भावे यांनी अनेक इतिहास अभ्यासकांना मौलिक मार्गदर्शन केले. -------------
भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा श्री. मा. भावे यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 3:03 PM