पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राष्ट्रपती २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. शहरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. लष्कराच्या या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमात त्या सहभागी देखील होणार आहेत.
बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन मुर्मू यांचे स्वागत केले. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची उपस्थिती होती.
यंदा ‘एनडीए’च्या १४५ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उद्या (३० नोव्हेंबर) पार पडणार आहे. राष्ट्रपती मुर्मू या संचलन सोहळ्यात उपस्थित राहून कॅडेट्सच्या वतीने मानवंदना स्वीकारतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये या प्रबोधिनीची ७५ वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने एनडीए च्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एनडीए खडकवासला येथील पासिंग आऊट परेडसाठी उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रपती खडकवासला हेलिपॅड येथून राहुरी विद्यापीठ येथील कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्यानंतर रात्री पुणे विमानतळावर त्यांचे आगमन होईल. तेथून शहरातील राजभवनात त्या मुक्कामी राहणार आहेत.१ डिसेंबर रोजी राष्ट्रपती मुर्मू राजभवन येथून वानवडी येथील आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथे परेडसाठी उपस्थित राहणार आहेत. परेडनंतर राष्ट्रपती पुणे विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करतील.