पुणे: वाघोलीतल्या फुलगावमधील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलमधील ४०० आदिवासी मुलांमुलींनी ढोलताशे वाजवत द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याचे स्वागत केले. आम्हाला तूमचा अभिमान वाटतो, आम्हीही तुमच्यासारखेच कर्तृत्ववान होण्याचा प्रयत्न करू असे लेखी आश्वासन त्यांना देत या मुलांनी मुर्मू यांना पुणे भेटीचे निमंत्रणही दिले.
माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या लोकसेवक प्रतिष्ठानच्या वतीने या शाळेचे संचलन केले जाते. गडचिरोली, चंद्रपूर पासून महाराष्ट्राच्या अन्य आदिवासी जिल्ह्यातील मुलांना प्रतिष्ठानने दत्तक घेऊन त्यांना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात मुलांबरोबरच मुलीही आहेत. त्या सर्वांनी गुरूवारी दुपारी शाळेच्या मैदानावर एकत्र येत मुर्मू यांच्या निवडीचे जोरदार स्वागत केले. सर्व मुलांनी हातामध्ये मुर्मू यांची प्रतिमा असलेली छायाचित्र धरली होती. मैदानावर फेर धरत त्यांनी आदिवासी नृत्यप्रकारही सादर केले.
पायगुडे म्हणाले, आदिवासी समाजातील मुर्मू यांच्याविषयी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना अभिमान आहे. तो व्यक्त व्हावा यासाठी आज या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात सर्व मुले सहर्ष सहभागी झाली होती. समाजातील व्यक्ती, तीसुद्धा महिला, देशाच्या सर्वोच्च पदावर बसल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपल्याला त्यांना संस्थेत बोलावायचेच या मुलांच्या आग्रहावरूनच मुर्मू यांन राष्ट्रपती भवनच्या पत्त्यावर पुणे शहराला व संस्थेला भेट देण्याचे लेखी निमंत्रण पाठवले असल्याचे पायगुडे यांनी सांगितले. प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांना स्वहस्ताक्षरात हे पत्र लिहिले असल्याची माहिती त्यांनी दिली.