पुणे : महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ संपला असून, नवीन अध्यक्षाची येत्या ५ मार्च रोजी निवड करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेत सर्वांत महत्त्वाची असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे लक्षात घेऊन ही निवड होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ सुनिल कांबळे, हेमंत रासने, उमेश गायकवाड की दिलीप वेडे-पाटील यांच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक येत्या ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यत असणार आहे. भूजल सर्वक्षणचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सामाजातील व्यक्तीला महापालिकेच्या मुख्य पदांवर प्रतिनिधी देण्याच्या दृष्टीने स्थायी समिती अध्यक्षपद निश्चित करताना जातीय समीकरण वरचढ ठरण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या अध्यक्षपदासाठी सुनिल कांबळे, हेमंत रासने, उमेश गायकवाड, दिलीप वेडेपाटील, राजेद्र शिळीमकर यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली आहे.आठ सदस्यांचा कार्यकाल संपत आलास्थायी समितीमध्ये भाजपाचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य आहेत. त्यातील ८ सदस्यांचा २ वर्षांचा कार्यकाल येत्या २८ फेब्रुवारीला मुदत संपत आहे. भाजपाने सहा आणि राष्ट्रवादीने दोन स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात भाजपाचे हेमंत रासने, राजेद्र शिळीमकर, दीपक पोटे, प्रकाश ढोरे, हेमाली कांबळे यांची, तर राष्ट्रवादीने महेंद्र पठारे आणि अशोक कांबळे यांची निवड केली आहे. सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा भाजपाने संधी दिली आहे.