इंदापूर : आमच्या नेत्यांनी आणलेला निधी आमच्या मर्जीनुसार खर्ची पडला पाहिजे, या अट्टहासाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा नगर परिषदेच्या प्रशासनावर दबाव आणून आपल्या सोयीने कामे करण्याचा प्रयत्न सुुरू आहे. नगर परिषदेच्या हद्दीत खासदार सुप्रिया सुळे व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निधीतून चाललेल्या कामांचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे.सन २०१६-१७ या वर्षातील ६४ लाख ७८ हजार ५८९ रुपयांचा निधी कापरासारखा उडून गेला आहे. अनेक कामे अपूर्ण राहिली असून, पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आलेली कामे दर्जाहीन झाली आहेत. खर्च झाला, कामे मात्र झाली नसल्याचे दिसत आहे. खासदार सुळे यांच्या निधीतून मंजूर झालेल्या वीस लाख रुपयांच्या निधीमधून शहराच्या मुख्य रस्त्यालगत सभागृह उभारणे (पाच लाख रुपये), रामवेस ते बावडावेस रस्ता तयार करणे (पाच लाख रुपये), अंबिकानगर येथील देवीचे मंदिर ते पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या भागात बंदिस्त गटार बांधणे (पाच लाख रुपये), शाहूनगर भागात रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख रुपये) ही कामे मंजूर करण्यात आली.आमदार दत्तात्रय भरणे यांच्या आमदार निधीतून त्याच वर्षासाठी ४३ लाख ८७ हजार रुपयांचा विकास निधी मंजूर झाला. त्यामधून नामदेव मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे (सात लाख रुपये), खडकपुरा भागातील राशिनची देवी परिसरात सामाजिक सभागृह उभारणे (सात लाख रुपये), रोहिदास मंदिरात सामाजिक सभागृह उभारणे (पंधरा लाख रुपये), मुख्य रस्त्यालगत सिद्धेश्वर मंदिरात सामाजिक सभागृह उभारणे (दहा लाख रुपये), अंबिकानगर भागात महादेव मंदिरात सामाजिक सभागृह उभारणे(४ लाख ८७ हजार रुपये) या कामांना मंजुरी मिळाली.या पैकी रामवेस ते बावडावेस रस्ता तयार करणे, नामदेव मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधणे ही कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. तर अंबिकानगर येथील देवीचा मंदिर ते महामार्गापर्यंतच्या भागात बंदिस्त गटार बांधणे हे काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येत आहे. शाहूनगर भागात रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ७ लाख ८८ हजार आहे. पाच लाख रुपये मिळाले होते. ते खर्ची पडल्याने उर्वरित काम निधीअभावी बंद असल्याचे दाखवण्यात येत आहे. उर्वरित कामे सुरु असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या रेकॉर्डमध्ये नमूद आहे. प्रत्यक्षात मात्र सर्व गोंधळच आहे. रामवेस नाका ते बावडा वेसनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्याच्या माहिती देण्याच्या फलकावर खासदार व आमदार या दोघांच्या निधीचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे रस्ता एकच पण कामांची नावे वेगळी देण्यात आली आहेत. फलकावरील एका कागदी फ्लेसवर दुसरा फ्लेक्स आणून चिकटवला आहे. दोन्हीही फाटून गेले आहेत.अंबिकानगर येथील देवीचे मंदिर ते महामार्गापर्यंतच्या भागातील बंदिस्त गटार बांधण्याचे काम नव्वद टक्के पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येत असले, तरी हे काम चालू असताना एक जणाने हरकत घेऊन यंत्राच्या सहाय्याने सारे काम उद्ध्वस्त करुन टाकले होते. नगर परिषदेकडे कामगारांचे पैसे देण्यासाठी निधी नाही. या पार्श्वभूमीवर एकदा तोडफोड झालेले काम पूर्ण करण्यासाठी पूरक निधी मिळेल का, हा प्रश्न आहे.>मुदतवाढीनंतरही कामांना लागेना मुहूर्तपंधरा लाख रुपये खर्चाच्या रोहिदास मंदिरात सामाजिक सभागृह उभारण्याच्या कामास आॅक्टोबर २०१६मध्ये मंजुरी मिळाली होती. दि. १६ जानेवारी २०१७ रोजी करारनामा झाला होता. सहा महिन्यांत काम पूर्ण करायचे होते. ते त्या कालावधीत सुरुच झाले नाही. नगर परिषदेने काम सुरु करण्यास आणखी तीन महिन्यांची वाढीव मुदत दिली. तरी ही ते कामे सुरु झाली नाहीत. त्यामुळे नगर परिषदेच्या नियमानुसार ते काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराला दर दिवसाला शंभर रुपये दंड आकारला जातो. मात्र या ठेकेदाराला नगर परिषदेने अभय दिले आहे.कामे तर त्यांच्या नेत्यांनी उपलब्ध करुनदिलेल्या निधीतील असल्याने त्यांनी ती आपल्या मर्जीनुसार करण्यासाठी नगर परिषदेच्या प्रशासनावर दबाव आणला. आपल्याला फायदेशीर ठरतील अशा ठेकेदारांकडे व त्यांच्याकरवी आपणाकडेही कामे कशी येतील हे पाहिले. त्यामुळेनिधी मिळूनही कामाचा दर्जा, वेग निरंक ठरला आहे.या नऊ कामांपैकी पाच कामे एकट्या ठेकेदाराला देण्यात आली आहेत. एकूण ६४ लाख ७८ हजार ५८९ रुपये खर्चाच्या कामांपैकी ३४ लाख ७३ हजार ११५ रुपयांची कामे त्याच्याकडे आहेत. रामवेस ते बावडावेस रस्ता तयार करणे, रोहिदास मंदिरात सामाजिक सभागृह उभारणे, अंबिकानगर येथील देवीचे मंदिर ते महामार्गापर्यंतच्या भागात बंदिस्त गटार बांधणे या वादग्रस्त कामांचा त्यामध्ये समावेश आहे.
राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रशासनावर दबाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:59 AM