पुणे: परदेशातून आलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून पोलिसी कारवाईची भिती दाखवून एका डॉक्टराची १ कोटी १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत बाणेर येथील एका ५० वर्षाच्या डॉक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉक्टरांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबई ते तैवान पाठविण्यात आलेले पार्सल परत आले असून त्यात पाच पासपोर्ट, परदेशी चलन, लॅपटॉप, अमली पदार्थ सापडले आहे. मुंबई विमानतळावर पाकीट जप्त करण्यात आले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर केला असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. चोरट्यांनी त्यांच्या साेशल मीडियातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यांच्यावर मनी लॉन्डिंग, डग्ज ट्रॉफिकिंगची केस होऊ शकते, अशी भिती दाखविली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे चोरट्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी आपली सर्व रक्कम १ कोटी १ लाख ३० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर केली. हा प्रकार १ ते ७ मार्च दरम्यान घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.
कशी टाळावी फसवणूक
* आपण कोणतेही कुरिअर पाठविले नसतानाही जर कोणी असे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये.* महाराष्ट्र, विशेषत: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी बोलत असल्याचे अनेकदा सायबर चोरट्यांकडून सांगितले जाते. हे बहुतेक परप्रांतीय असतात. महाराष्ट्रातील सर्व पोलिस अधिकार्यांना मराठी बोलता येते. फसवणूक टाळायची असेल तर अशा फोनवर चक्क मराठी बोला. त्यातून तुमची फसवणूक टाळेल.
* कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही खात्यात पैसे पाठवून नका* कोणतेही सरकारी अथवा पोलिस खाते कोणत्याही खात्यात पैसे पाठविण्यास सांगत नाही.