पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाचा २०१५-१६ या वर्षीचा १४० कोटी ८१ लाख रुपयांचा अंतिम अर्थसंकल्प गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षण मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शालेय खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य मिळत नसल्यामुळे शिक्षण मंडळ ठेकेदारच चालवीत असल्याची टीका नगरसेवकांनी केली.शिक्षण मंडळाचा २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाचा ११३ कोटी ७८ लाखांचा सुधारित अर्थसंकल्प आणि आगामी २०१५-१६ चा ११० कोटी ९६ लाखांचा मूळ अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्तांनी गेल्या महिन्यात स्थायी समितीसमोर सादर केला होता. शिक्षण मंडळ प्रशासनाने मूळ अर्थसंकल्पात १२३ कोटी ९९ लाखांची तरतूद सुचविली होती. त्यामध्ये शिक्षण मंडळ सदस्यांनी ५ कोटी ८ लाखांची वाढ करीत १२९ कोटी ७ लाख रुपयांच्या खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे आयुक्त राजीव जाधव यांनी त्यात १८ कोटी १८ लाखांची कपात सुचविली. तसेच केवळ ११० कोटी ९६ लाख ५० हजार खर्चाचा अर्थसंकल्प गेल्या महिन्यात पुन्हा स्थायी समितीपुढे सादर केला होता. त्यानंतर शिक्षण मंडळ सदस्यांनी आग्रह धरल्याने १९ कोटी ८५ लाख रुपयांच्या उपसूचना स्थायी समितीने मंजूर केल्या. स्थायी समितीने शाळा फर्निचर, शाळा दुरुस्ती व देखभाल, कचरापेट्या, साहित्यखरेदी, शारीरिक शिक्षण साहित्य खरेदी, पीटी गणवेश, पाट्या, दफ्तरे, स्वेटर वीजरोधक यंत्रणा, सायन्स पार्क भेट आदींवरील खर्चकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला. या वाढीनंतर १३० कोटी ८१ लाख २२ हजार खर्चाचा अर्थसंकल्प महापालिका सभेपुढे सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर गुरुवारी झालेल्या सभेत चर्चा झाली. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या माध्यमातून सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. शिक्षणाच्या ढासळत असलेल्या दर्जाला शिक्षकवर्ग व पालिका प्रशासन जबाबदार आहे, आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. स्थायीने मंजूर केलेल्या १३० कोटी ८१ लाख २२ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पात १० कोटींची वाढ करून एकूण १४० कोटी ८१ लाख २२ हजार रुपयांच्या अंतिम अर्थसंकल्पाला महापालिका सभेने मंजुरी दिली. या चर्चेत मंगला कदम, शांताराम भालेकर, सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर, सुलभा उबाळे, बाबा धुमाळ, तानाजी खाडे, गोरक्ष लोखंडे, उल्हास शेट्टी, अरुण बोऱ्हाडे, अनिता तापकीर, राजेंद्र काटे, शमीम पठाण, संजय काटे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
शालेय साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार रोखा
By admin | Published: February 27, 2015 6:02 AM