पुणे : गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. विधीसंर्घषित, पीडित मुलांचे समुपदेशन करण्यासाठी, तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरात बालस्नेही पोलीस कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. ‘होप फाॅर द चिल्ड्रेन फाऊंडेशन’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याबाबत भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांनी सांगितले, विधीसंर्घषित बालकांसाठी आम्ही नियमितपणे समुपदेशन शिबिरांचे आयोजन करतो. त्यात मुले व पालकही सहभागी होतात. मुलांबरोबरच त्यांच्या पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांत कोरोनामुळे अडथळा आला होता. आता हे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांच्यातील कौशल्य वाढीचा प्रयत्न केला जातो. तसेच मोबाईल दुरुस्ती, जीम टेनर असे काही कोर्स त्यांना स्वयंसेवी संस्थेमार्फत शिकविले जातात. त्यांच्या नाेकरीसाठी प्रयत्न केले जातात. ज्यांना शिक्षणाची आवड आहे, त्यांची शालेय फी, फाॅर्म फीसाठी मदत केली जाते.
''गुन्हेगारी कृत्यापासून अल्पवयीन मुलांना रोखण्यासाठी पोलीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तसेच गुन्हेगारीत ओढल्या गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुणे पोलीस कार्यरत असल्याचे पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.''
पालक आणि मुलांमधील संवाद वाढणे गरजेचे
''आज मुलांचे विश्व स्मार्ट फोन, टीव्ही, लॅपटॉप यांनी व्यापून टाकले आहे. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास, मनमोकळा संवाद, सर्जनशीलता, कल्पकता या गोष्टी कुठतरी हरवल्या असून, या आभासी जगतामुळे मुले एकलकोंडी बनत आहेत. एखादी मनासारखी गोष्ट न घडल्यास चिडचिड करणे, लगेच राग येणे, हट्टीपणा, नकारात्मकता, हिंसक कृती असे मानसिक बदल मुलांमध्ये दिसून येत आहेत. पालक आणि मुलांमधील संवाद, मुलांना विधायक कामांची ओळख करून देणे हेच यावरील उपाय आहेत असे बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. सीमा डोईफोडे सांगितले.''